यंदा पाऊस सर्व विक्रम मोडणार

0
5

>> आतापर्यंत राज्यात 160.46 इंच पावसाची नोंद

राज्यात यंदा मान्सून धो-धो बरसत असून, तो यंदा सर्व विक्रम मोडीत काढणार आहे. यंदाच्या मोसमात 100 दिवसांत विक्रमी 160.46 इंच पावसाची नोंद झाली आहे. 1961 मध्ये पडलेल्या 160 इंच पावसापेक्षा यंदा जास्त पाऊस झाला आहे. 2020 मध्ये राज्यात सर्वाधिक 162.02 इंच पाऊस पडला होता, तो विक्रम यावर्षी नक्कीच मोडला जाणार आहे.

राज्यात मोसमी पावसाचे प्रमाण आत्तापर्यंत 45.6 टक्के जास्त आहे. वाळपई पावसाने इंचाचे द्विशतक ओलांडले असून, आत्तापर्यंत 208.31 इंच पावसाची नोंद झाली आहे. यंदा राज्यात सर्वांत कमी पावसाची नोंद दाबोळी येथे 125 इंच एवढी झाली आहे.

राज्याला यंदा मोसमी पावसाने झोडपून काढले आहे. राज्यात वर्ष 2020 मध्ये जोरदार पावसाची नोंद झाली होती. या वर्षी सुध्दा आत्तापर्यंत जोरदार पावसाची नोंद झाली आहे. मागील जुलै महिन्यात विक्रमी 78 इंच एवढ्या पावसाची नोंद झाली होती. जून महिन्यात 38 इंच आणि ऑगस्ट महिन्यात 39 इंच अशी पावसाची नोंद झाली. ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी आणि अखेरीस जोरदार पावसाची नोंद झाली. सप्टेंबर महिन्यात सुध्दा सरासरी पावसाची नोंद होत आहे.

राज्यात वाळपई येथे पावसाने इंचाचे द्विशतक ओलांडले आहे, तर सांगे येथे पाऊस द्विशतकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. राज्यातील आठ विभागांनी पावसाच्या 150 इंचाचा टप्पा ओलांडला आहे. या विभागांमध्ये पेडणे, फोंडा, जुना गोवा, साखळी, केपे, काणकोण आणि सांगे या विभागांचा समावेश होत आहे.
गेल्या 24 तासांत राज्यातील सर्वच विभागांत पावसाची नोंद झाली. येथील हवामान विभागाने येत्या 10 सप्टेंबरला पावसाची शक्यता व्यक्त केली असून, पिवळा अलर्ट जारी केला आहे.