यंदा नवे शैक्षणिक वर्ष 1 एप्रिलपासून

0
3

राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निर्णय; शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांच्याकडून परिपत्रक जारी

राज्य सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या (एनईपी) कार्यवाहीसाठी नवे शैक्षणिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. इयत्ता सहावी ते दहावी आणि बारावीचे वर्ग एप्रिल महिन्यात सकाळी 11.30 वाजेपर्यंत घेण्यात येतील. विद्यालयांना 1 मे ते 3 जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी दिली जाणार असून, 4 जूनपासून पूर्वीच्या वेळेप्रमाणे वर्ग सुरू राहतील.शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी यासंबंधीचे एक परिपत्रक काल जारी केले आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार आठवड्याला 36 ते 39 तास शिकवणी होणे आवश्यक आहे. हे तास भरून काढण्यासाठी एक तर शैक्षणिक दिवस वाढवावे किंवा शाळा/विद्यालयांच्या वेळा वाढवावा लागणार आहेत. विद्यालयाच्या वेळेत वाढ करणे शक्य नसल्याने शिकवणीचे तास भरून काढण्यासाठी एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

1 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत सकाळी 11.30 पर्यंत वर्ग घेतल्याने शिकवणीचे तास भरून येणार आहेत. यापूर्वी राज्यातील शैक्षणिक वर्ष जूनमध्ये सुरू होत होते. त्यामुळे अंतिम परीक्षा झाली की विद्यार्थ्यांना एप्रिलनंतर सुट्टी मिळत होती. नवीन निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मिळणार जादा दिवस सुट्टी मिळणार नाही. नववी इयत्तेसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. येत्या शैक्षणिक वर्षी सहावी व दहावीसाठी एनईपी लागू होणार आहे. इयत्ता अकरावीचे शैक्षणिक वर्ष जूनमध्येच सुरू होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दोन्ही सत्रांमध्ये समानता येणार
शैक्षणिक वर्ष एप्रिलपासून सुरू करण्याच्या निर्णयाने दोन्ही सत्रामध्ये समानता येणार आहे. तसेच, केंद्र सरकारची माध्यान्ह आहार योजना घेण्यासाठी एक ठराविक वेळ भरून काढणे आवश्यक असते. 1 एप्रिलपासून शाळा सुरू केल्यास ही वेळ भरून निघणे सहज शक्य होणार आहे, असे शिक्षण सचिव लोलयेकर यांनी सांगितले.

एप्रिल महिना फलदायी ठरणार
एप्रिलमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू केल्याने विद्यार्थ्यांसाठी ह महिना शैक्षणिकदृष्ट्‌‍या फलदायी बनण्यास मदत होणार आहे. अन्यथा एप्रिल महिना शिक्षणासाठी फलदायी ठरत नव्हता. दिवाळीच्या सुट्टीतील काही दिवस देखील शाळाबाह्य शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा विचार केला जात आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी राज्यातील मुख्याध्यापकांची बैठक आयोजित केली आहे, असेही प्रसाद लोलयेकर यांनी सांगितले.

महाराष्ट्र, मिझोरममध्येही असाच निर्णय
सीबीएसई, आयसीएसईसारख्या केंद्रीय मंडळांचे शैक्षणिक वर्ष एप्रिलपासून सुरू होते, तर महाराष्ट्र, मिझोरम इत्यादी राज्यांच्या शिक्षण मंडळांनी सुद्धा एप्रिलपासून त्यांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही शिक्षण सचिव लोलयेकर यांनी सांगितले.