यंदा देशात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस

0
14

>> भारतीय हवामान विभागाने वर्तवला पहिला अंदाज

देशातील नागरिकांसाठी आणि शेतकर्‍यांसाठी भारतीय हवामान विभागाने एक आनंदाची बातमी दिली आहे. यंदा देशात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडणार आहे. भारतीय हवामान विभागाने काल मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला. त्यानुसार यंदा देशात पाऊसमान सामान्य राहण्याचा अंदाज आहे. यंदा देशात चांगला पाऊस पडणार असल्याने शेतकर्‍यांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे.

दरवर्षी शेतकर्‍यांना भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची प्रतीक्षा असते. यंदा देशात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस होणार असल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणार्‍या पावसाचा अंदाज देखील भारतीय हवामान विभागाने काल जाहीर केला. त्यानुसार एकूण पावसाच्या ७४ टक्के पाऊस हा जून ते सप्टेंबर या कालावधीत पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच हवामानाची माहिती देणार्‍या स्कायमेट या खासगी संस्थेने देशभरातील यंदाच्या मान्सूनचा अंदाज जारी केला होता. यंदा मान्सून सामान्य राहील, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला होता. या अंदाजानुसार देशभरात मान्सून (जून ते सप्टेंबर) सरासरीच्या ९८ टक्के राहण्याची शक्यता स्कायमेट या संस्थेन वर्तवली होती.

दरम्यान, देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी मान्सून समाधानकारक बरसणे महत्त्वाचे आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा तर आहेच; पण कॉर्पोरेट कंपन्यांपासून ते शहरांमध्ये राहणार्‍या लोकांपर्यंतही त्याचा मोठा परिणाम होत असतो.