>> एकूण सव्वालाख देशी-विदेशी पर्यटक गोव्यात
>> दुसरा टप्पा सुरू, फेब्रुवारीत येणार पहिले विदेशी जहाज
यंदाच्या 2024-25 या सागरी पर्यटन हंगामाच्या पहिल्या टप्प्याची सांगता ‘एम्प्रेस’ या देशांतर्गत पर्यटक जहाजाने झाली. या पहिल्या टप्प्यात सप्टेंबर ते डिसेंबर 2024 पर्यंत एकूण 4 विदेशी पर्यटक जहाजे गोव्यात मुरगाव बंदरात दाखल झाली व यातून 6888 विदेशी पर्यटक गोव्यात आले व गोव्याच्या सौदर्यसृष्टीचा आनंद लुटला. तर 11 फेऱ्या एम्प्रेस या देशांतर्गत पर्यटक जहाजाच्या झाल्या. या पर्यटक जहाजातून 28600 देशी पर्यटक गोव्यात दाखल झाले व गोवा भ्रमंती केली. एकूण दोन्ही प्रकारच्या 15 पर्यटक जहाजातून 35488 देशी विदेशी पर्यटक सागरी पर्यटनाच्या पहिल्या टप्प्यात सप्टेंबर ते डिसेंबर 2024 या काळात गोव्यात दाखल होऊन गोवा भ्रमंती केली व गोव्यातील सौंदर्य सृष्टीचा आनंद लुटून मायदेशी परतले.
जानेवारी ते डिसेंबर 2024 पर्यंत विदेशी जहाजांच्या 19 फेऱ्या मुरगाव बंदरात झाल्या. यातून 25888 विदेशी पर्यटक गोव्यात दाखल झाले. तर 44 फेऱ्या ‘एम्प्रेस’ या देशांतर्गत पर्यटक जहाजाच्या मुरगाव बंदरात झाल्या. यातून 96600 देशी विदेशी पर्यटक गोव्यात दाखल झाले. तर एकंदरीत दोन्ही प्रकारच्या जहाजातून 1 लाख 22 हजार 488 देशी विदेशी पर्यटक गोव्यात दाखल होऊन गोवा भ्रमंती करून गोव्याच्या सौंदर्य सृष्टीचा आनंद लुटला व गोव्यातील पर्यटनास चालना दिली.
18 विदेशी जहाजे
जानेवारी ते जून 2024 पर्यंत 18 विदेशी पर्यटक जहाजे गोव्यात दाखल झाली. यात ले जेक्स कारटीयर, सिल्वर मून, सेलेब्रीटी मिलेनियम, हमबर्ग, सिल्वर विस्पर, बोरीलेस, क्रिस्टल सिम्पनी, विकींग स्काय, विकींग नेपच्यून, सेवन सीज मरीनर, कोस्टल सेरेनीटी, मरेला डिस्कवरी, कॉस्ता डेलिझीओमा, सेवेन सीज नेवीगेटर, सेरेनाडे ऑफ द सीज, रिवेरा आदी विदेशी पर्यटक जहाजे गोव्यात दाखल झाली.
दुसऱ्या टप्प्यातील पहिले
विदेशी जहाज फेब्रुवारीत
2024-25 या पर्यटन हंगामाची दुसऱ्या टप्प्याची सुरुवात एमव्ही एम्प्रेस या देशांतर्गत जहाजाद्वारे गुरुवार दि. 1 जानेवारी 2025 रोजी झाली. तर या दुसऱ्या टप्प्यात पहिले विदेशी पर्यटक जहाज गुरुवार दि. 20 फेब्रुवारी रोजी ‘सेलेब्रीटी मिलेनियम’ या जहाजाद्वारे होणार आहे. या पर्यटक जहाजातून पर्यटक व कर्मचारी मिळून 2884 देशी विदेशी पर्यटक मुरगाव बंदरात दाखल होणार आहेत. सदर जहाज मुंबईमार्गे गोव्यात दाखल होणार आहे. नंतर ते पर्यटकांना घेऊन कोलंबो येथे रवाना होणार आहे. शनिवार 1 मार्च 2025 रोजी न्यू मेंगलोर मार्गे ‘ब्रीडीयन स्काय’ हे विदेशी पर्यटक जहाज मुरगाव बंदरात 120 पर्यटक व 58 कर्मचारी मिळून 178 देशी विदेशी पर्यटक दाखल होणार आहे. शुक्रवार दि. 28 मार्च 2025 रोजी ‘अमादीया’ हे विदेशी पर्यटक जहाज कोचीनमार्गे मुरगाव बंदरात 650 पर्यटक व 250 कर्मचारी मिळून 900 देशी विदेशी पर्यटक घेऊन दाखल होणार आहे. रविवार दि. 6 एप्रिल 2025 रोजी ‘नोर्वेजियन स्काय’ हे विदेशी पर्यटक जहाज न्यू मेंगलोरमार्गे गोव्यात मुरगाव बंदरात 3394 देशी विदेशी पर्यटकांना घेऊन मुरगाव बंदरात दाखल होणार आहे. शुक्रवार दि. 2 मे 2025 रोजी नौटीका हे पर्यटक जहाज न्यू मेंगलोरमार्गे 830 पर्यटक व 375 कर्मचारी मिळून 1205 देशी विदेशी पर्यटकांना घेऊन मुरगाव बंदरात दाखल होणार आहे. शनिवार दि. 10 मे रोजी ‘सेव्हन सीज’ हे विदेशी पर्यटक जहाज मुंबईमार्गे 1120 देशी विदेशी पर्यटकांना घेऊन मुरगाव बंदरात दाखल होणार आहे.
जूनमध्ये सांगता
2024-25 या सागरी पर्यटन हंगामातील शेवटचे विदेशी पर्यटक जहाज ‘सिल्वर व्हीस्पर’ सोमवार दि. 12 मे 2025 रोजी कोचीनमार्गे 740 देशी विदेशी पर्यटकांना घेऊन मुरगाव बंदरात दाखल होणार आहे. या पर्यटन हंगामाची सांगता शनिवार दि. 14 जून 2025 रोजी एमव्ही एम्प्रेस या देशांतर्गत जहाजाद्वारे होणार आहे.