यंदाचा इफ्फी असेल अधिक लोककेंद्रित अन्‌‍ सर्वसमावेशक

0
1

>> मनोरंजन आर्केड, विशिष्ट संकल्पनेवरील परेडचे आयोजन करणार; गोवा मनोरंजन सोसायटीत सुकाणू समितीची बैठक संपन्न

केंद्रीय माहिती व प्रसारण सचिव संजय जाजू आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली काल गोवा मनोरंजन सोसायटीत (ईएसजी) झालेल्या एका बैठकीत यंदाचा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) अधिक लोककेंद्रित, सर्वसमावेशक, संस्मरणीय व दिमाखदार बनवण्याचा निर्णय घेण्यात आला.
इफ्फीचे संचालक व भारतीय चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर व इफ्फीच्या सुकाणू समितीचे सदस्य, तसेच माहिती-प्रसारण मंत्रालय व राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत यंदाच्या इफ्फीत भारतीय सिनेमाचा गौरव करण्यासाठी विशिष्ट संकल्पनेवरील परेडचे आयोजन करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. ही परेड इफ्फीची शोभा वाढवणारी ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या परेडमध्ये स्थानिक समुदायाला सामावून घेण्याचा निर्णयही घेण्यात आला.

यंदाच्या इफ्फीत परेडबरोबरच इफ्फीस्थळी एक मनोरंजन आर्केडही उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकांच्या सहभागाने या आर्केडमध्ये भारतीय सिनेमा व संस्कृतीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. या संवादात्मक कार्यक्रमात उपस्थितांना चित्रपट उद्योग आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचा परिचय करून दिला जाणार आहे. याशिवाय यंदाच्या इफ्फीत तरुणांना आणि सिनेसृष्टीतील उदयोन्मुख प्रतिमेला आपले कार्य प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचाही निर्णय घेण्यात आला. या बैठकीला सुकाणू समितीचे सदस्य बॉबी बेदी आणि रवी कोट्टरक्कर, माहिती-प्रसारण मंत्रालयाचे प्रसारण संयुक्त सचिव आणि एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक पृथृल कुमार, माहिती-प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट संयुक्त सचिव वृंदा देसाई, दिग्दर्शिका अनुरिमा शर्मा, ओएसडी फिल्मचे श्रीरंग मुकुंदन, ईएसजीच्या सीईओ अंकिता मिश्रा आदी उपस्थित होते.