- प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट
गोवा, दमण व दीव संघप्रदेशाच्या सहाव्या विधानसभेची निवडणूक दि. २७ डिसेंबर १९८४ रोजी झाली. पाचव्या विधानसभेची दि. ३ जानेवारी १९८० रोजी झालेली निवडणूक ‘अर्स कॉंग्रेस’ने बहुमताने जिंकली होती. जानेवारी १९८० मधील पहिले विधानसभा अधिवेशन संपल्यावर लगेच गोव्यातील ‘अर्स कॉंग्रेस’ ‘इंदिरा कॉंग्रेस’मध्ये विलीन करण्यात आली होती. कारण गोव्यात जरी ‘अर्स कॉंग्रेस’ने विधानसभा निवडणुकीत बाजी मारली होती तरी देशात इंदिरा कॉंग्रेसची सरशी होऊन त्यांचे केंद्रस्थानी सरकारही स्थापन झाले होते. केंद्रात सत्तास्थानी इंदिरा कॉंग्रेस असल्यामुळे इतर काही राज्यांप्रमाणे गोव्यातील ‘अर्स कॉंग्रेस’चे विधानसभेतील सर्व विधिमंडळ सदस्य व पक्षाचे पदाधिकारी पक्ष विसर्जित करून ‘इंदिरा कॉंग्रेस’मध्ये सामील झाले होते. कै. शशिकलाताई काकोडकर यांच्या नेतृत्वाखालील ‘महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष’ही ऍड्. रमाकांत खलप व कै. ऍड. बाबुसो गावकर हे दोन आमदार वगळता देऊ मांद्रेकर (पेडणे), ऍड. विष्णू रामा नाईक (पाळी), कै. विनायक धर्मा चोडणकर (कुंभारजुवे), नरसिंहभाय तांडेल (दमण) व शामजी भाय सोळंकी (दीव) यांच्यासह ‘इंदिरा कॉंग्रेस’मध्ये दाखल झाला होता. शिवोलीचे आमदार ऍड्. चंद्रकांत उत्तम चोडणकर, म. गो. पक्षाध्यक्षा व माजी मुख्यमंत्री कै. शशिकलाताई काकोडकर यांना पराभूत करून डिचोली मतदारसंघातून निवडून आलेले श्री. हरिष झांट्ये व हल्लीच दिवंगत झालेले व पणजी मतदारसंघातून निवडून आलेले कै. विष्णू अनंत नाईक हे तिन्ही आमदारही ‘इंदिरा कॉंग्रेस’मध्ये दाखल झाले होते.
वास्तविक पाहता तीस सदस्यांच्या या विधानसभेत सत्ताधारी इंदिरा कॉंग्रेसचे अठ्ठावीस सदस्य होते. परंतु कळंगुट मतदारसंघातून अर्स कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आलेले व प्रदेश अर्स कॉंग्रेसचे अध्यक्ष असलेले व नंतर इंदिरा कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले ख्रि. डॉ. विल्फ्रेड डिसौझा यांनी पक्षाविरुद्ध बंड केले व त्यांनी पक्षातून बाहेर पडून दि. १७ सप्टेंबर १९८३ रोजी ‘गोवा कॉंग्रेस पक्षा’ची स्थापना केली होती. कै. शशिकलाताई काकोडकर यांनी इंदिरा कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रदेशाध्यक्षपद देण्याचं दिलेलं वचन न पाळल्यामुळे कै. शशिकलाताईही आपल्या समर्थक आमदारांसह इंदिरा कॉंग्रेसमधून बाहेर पडल्या व त्यांनी दि. २० ऑक्टोबर १९८३ रोजी पुन्हा म.गो. पक्षात प्रवेश केला होता. दुर्दैवाने त्यांच्या स्वभावविशेषामुळे म. गो. पक्षनेतृत्वाशी त्यांच्या विचारांची तार न जुळल्यामुळे त्यांनी पुन्हा म.गो. पक्षाशी फारकत घेऊन दि. १९ नोव्हेंबर १९८४ रोजी कै. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या अर्धांगिनी व कै. शशिकलाताईंच्या मातोश्री कै. सुनंदाबाई बांदोडकर यांच्या नेतृत्वाखाली ‘भाऊसाहेब बांदोडकर गोमंतक पक्ष’ स्थापन केला.
ज्या कै. शशिकलाताईंनी अस्मादिकांसारख्या युवकाला इ.स. १९७५ मध्ये प्रथम म्हापसा नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी दिली व त्यानंतर इ.स. १९७७ मध्ये गोवा, दमण व दीव संघप्रदेशाच्या विधानसभेच्या निवडणुकीत म्हापसा मतदारसंघातून लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आणलेल्या कै. शशिकलाताईंना साथ देत अस्मादिक ‘भाऊसाहेब बांदोडकर गोमंतक पक्षा’च्या स्थापनेत सहभागी झाले होते. पणजी येथील जुन्ता हाऊसमधील स्वामी विवेकानंद सभागृहात झालेल्या कार्यकर्त्यांच्या सभेनंतर पक्षस्थापनेची घोषणा करण्यात आली होती.
त्यानंतर दि. २७ डिसेंबर १९८४ रोजी झालेल्या गोवा, दमण व दीव संघप्रदेशाच्या सहाव्या विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीत म्हापसा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तत्कालीन म.गो. पक्षाचे सर्वेसर्वा ऍड्. रमाकांत खलप यांनी मला विनंती केली होती. गोव्याच्या राजकीय क्षितिजावर झळकण्याची संधी मला कै. शशिकलाताईंनी दिल्याची जाणीव ठेवून व वडीलबंधू कै. अशोक वसंत सिरसाट यांच्या सल्ल्यानुसार मी कै. ताईंना साथ देत भाऊसाहेब बांदोडकर गोमंतक पक्षाचे कार्य हाती घेतले. पक्षासाठी ‘भाऊसाहेब बांदोडकर गोमंतक पक्ष’ हे नाव सुचविण्यातही अस्मादिकांचाच पुढाकार होता हे या ठिकाणी मुद्दाम नमूद करू इच्छितो.
कै. भाऊसाहेब बांदोडकरांचे कार्य आपल्याला पुढे न्यायचे असल्याने व जनसामान्यांमध्ये कै. भाऊंविषयी असलेले प्रेम, आदर व निष्ठा याचा फायदा या नूतन पक्षाला मिळावा ही हे नाव सुचविण्यामागची भावना होती. त्यामुळे ऍड्. रमाकांत खलप यांनी केलेल्या विनंतीला मी सविनय नकार दिला होता. पुढे मग एकूण राजकीय वातावरण म्हापसा मतदारसंघातील म.गो. कार्यकर्त्यांचा कल पाहता पक्षकार्यकर्ते म.गो. पक्षाच्या ‘सिंह’ चिन्हाबरोबर असल्याचे जाणवले आणि म्हापसा-सीम येथील कै. ताई समर्थक कै. प्रभाकर दत्ताराम पानकर यांच्या निवासस्थानी झालेल्या ‘भाबांगो’ पक्षाच्या बैठकीत मी निवडणूक लढविण्यास सविनय नकार दिल्यानंतर ही उमेदवारी म्हापशातील एक सुविद्य मध्यमवयीन कै. चंद्रकांत शिवा कोचकर यांना बहाल करण्यात आली. कै. चंद्रकांत कोचकर हे आमचे वडीलबंधू कै. अशोक सिरसाट यांचे खूप जवळचे मित्र असल्याने त्यांच्या सल्ल्यावरून मी कै. चंद्रकांत कोचकर हे निवडून यावेत म्हणून खूप झटलो होतो. दुर्दैवाने या निवडणुकीत माझे सारे प्रयत्न फोल ठरले होते.
अस्मादिकांनी ही निवडणूक लढविण्यास म.गो. पक्षाला सविनय नकार दिल्यामुळे सुरुवातीपासून म.गो. पक्षाचे म्हापसा मतदारसंघातील एक खंदे व प्रामाणिक कार्यकर्ते तसेच ऍड्. रमाकांत खलप यांचे खूप जवळचे मित्र तथा शेजारी कै. चंद्रकांत शिवराम दिवकर यांना म.गो. पक्षाची उमेदवारी दिली होती.
या निवडणुकीत इंदिरा कॉंग्रेस पक्षाने तीसही जागांवर आपले उमेदवार उभे केले होते, तर इंदिरा कॉंग्रेस पक्षाशी फारकत घेऊन वेगळा ‘गोवा कॉंग्रेस पक्ष’ स्थापन करणार्या ख्रि. डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांनी अठ्ठावीस जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. म.गो. पक्षाने सव्वीस जागा, ‘भाबांगो’ तेवीस जागा, प्रथमच निवडणूक लढवणार्या भाजपाने सोळा जागा लढवल्या होत्या.
या निवडणुकीत म्हापसा मतदारसंघातल्या विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी सहभाग घेतला. म.गो. पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात पुन्हा एकदा म.गो. पक्षाचे कै. चंद्रशेखर दिवकर हे निवडून आले. त्यांना या निवडणुकीत ४६४९ मते मिळाली होती, तर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे (इंदिरा) उमेदवार श्री. उल्हास भिकू धुरी यांना दुसर्या क्रमांकाची ४२५७ मते मिळाली होती. डॉ. विल्फ्रेड डिसौझा यांच्या नेतृत्वाखाली नव्याने स्थापन झालेल्या गोवा कॉंग्रेसचे उमेदवार माजी आमदार कै. श्यामसुंदर नेवगी यांना ३२७४ मते, भांबागोचे कै. चंद्रकांत शिवा कोचकर यांना ८२१ मते, भाजपाचे श्री. चंद्रकांत जयराम पंडित यांना ५८९ मते, अपक्ष ख्रि. मॅथ्यू उर्बान ब्रागांझा यांना २५३ मते, अपक्ष ऍड. कुमार सदाशिव गायतोंडे यांना १४० मते, तर अपक्ष ऍड. संजीव सरदेसाई यांना ३६ मते मिळाली होती.
कै. चंद्रशेखर उपाख्य बाबू शिवराम दिवकर यांच्याजवळ वक्तृत्वाचे फार मोठे गुण नसले तरी आपल्या परीने म्हापसा मतदारसंघातील जनतेच्या समस्या त्यांनी हिरिरीने सभागृहात सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं होतं. विधिमंडळाच्या कायदा छाननी समितीचे सदस्य, हक्कभंग समिती सदस्य, शासकीय आश्वासन समिती सदस्य (१९८८-८९) म्हणून ते कार्यरत होते. ते जाज्वल्य मराठीभिमानी असल्यामुळे विधिमंडळात तथा विधिमंडळाबाहेरही मराठी राजभाषा व्हावी यासाठी कार्यरत राहिले. इ.स. १९८४ साली जेव्हा मराठी राज्यभाषेचा प्रश्न उपस्थित झाला आणि मराठी भाषकांचे जे जनआंदोलन उभे राहिले त्यात कै. बाबू दिवकर हिरिरीने सहभागी झाले होते. दि. १७ जुलै १९८६ रोजी कॉंग्रेस सरकारने कोकणी राजभाषा करणारे जे विधेयक सभागृहासमोर ठेवले होते ते अखेर दि. ४ फेब्रुवारी १९८७ रोजी विधानसभेत म.गो. पक्षाने आणलेल्या कोकणी राजभाषा व मराठीला समान दर्जा अशा दुरुस्तीसह संमत झाले होते. त्यावेळी म.गो. पक्षाच्या इतर विधिमंडळ सदस्यांमध्ये कै. बाबू दिवकरही सहभागी होते. मराठी राजभाषा व्हावी यासाठी म.गो. पक्षाने जी जनजागृती केली होती त्यांत कै. बाबू दिवकरांचाही ‘सिंहाचा वाटा’ होता.
कै. बाबू दिवकर यांचे म्हापसानगरीतील सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक व कला क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान होते. म्हापसा वैश्यमंडळ, रोटरी क्लब ऑफ म्हापसा, श्रीदेव बोडगेश्वर देवस्थान, म्हापसा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्रीदेव राष्ट्रोळी देवस्थान (धुळेर- म्हापसा) या संस्थांशी ते संबंधित होते. त्यांचे वडील हे उत्कृष्ट नेपथ्यकार, रंग व वेशभूषाकार होते. त्यांचाच वसा कै. बाबू व त्यांचे वडीलबंधू गोवा मुक्तिलढ्यातील एक स्वातंत्र्यसेनानी कै. महाबळेश्वर उपाख्य दादा शिवराम दिवकर यांनी घेतला होता. म्हापसा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रीगणेशमूर्तीचं व श्रीदेव बोडगेश्वर देवस्थानच्या जत्रेच्या वेळी वेशभूषा व सजावट करण्याचं काम ते भक्तिभावाने करायचे. सध्या कला शिक्षक असलेले त्यांचे पुतणे श्री. देवेश व रंगकामाचे कंत्राटदार श्री. विवेक महाबळेश्वर दिवकर हे कार्य पुढे नेत आहेत. दरम्यान, कै. बाबू दिवकर हे भव्य इमारतींच्या रंगकामाचे कंत्राट घ्यायचे. त्यांचे सुपुत्र श्री. सिद्धेश हे सध्या बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहेत. दुर्दैवाने दि. १९ फेब्रुवारी २००६ रोजी अल्पशा आजाराने वयाच्या बासष्ठाव्या वर्षी त्यांचे दुःखद निधन झाले.
याठिकाणी एका गोष्टीचा मुद्दाम उल्लेख करतो. कै. बाबू दिवकर हे शेगांवच्या गजानन महाराजांचे परमभक्त होते. एकदा त्यांनी गजानन महाराजांना आपल्या घरी निमंत्रित केले असता त्यांच्या आदेशावरून म्हापशातील त्यांच्या मित्रांना व नागरिकांना महाप्रसादाचे आपल्या घरी भोजन दिल्याचे मला आजही आठवते. त्यांच्या घरासमोर एक घुमटी बांधून त्यांनी गजानन महाराजांच्या मूर्तीची स्थापना केली आहे.