म्हापसा (न. प्र.)
म्हापसा बसस्थानकावर उघड्यावर आमलेट- पाव, भाजी पाव व इतर वस्तू रात्र दिवस बनवतात त्यावर माशा बसलेल्या असतात. तसेच घाणीचे साम्राज्य पसरलेले असते, कचर्याचा ढीग त्यावर बसलेली गुरे यामुळे दुर्गंधी पसरलेली असताना या व्यावसायिकांना कुणी हटवीत नाही किंवा आरोग्य केंद्र अन्न व पदार्थ खात्याचे याकडे दुर्लक्ष झालेले असल्याने हा व्यवसाय जोरात चालला आहे. त्याकडे त्वरित संबंधितांनी लक्ष घालून यावर कारवाई केली नाही तर रोगराई वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
याच कदंब बसस्थानकाच्या बाजूला नव्याने बस स्थानक उभारण्यासाठी जमीन घेण्यात आलेली आहे. त्या जमिनीचे सपाटीकरण करून तेथे लाखो रुपये खर्च करून मातीचा भराव टाकण्यात आला. पण अजून पर्यंत बस स्थानक उभे राहत नसल्याची खंत म्हापसा यूथ संघटनेचे अध्यक्ष प्रवीण आसोलकर यांनी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की पावसाच्या दिवसात येथे पाणी साचून राहते आणि तळ्याचे स्वरूप प्राप्त होते. तर काही अवजड सामान घेऊन येणारे ट्रक वाले रात्रीच्या वेळी ट्रक उभे करून तेथेच राहतात. येथे अनेक झोपड्या उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्यात परप्रांतीय लोक मोठ्या संख्येने राहतात. त्याकडे म्हापसा पालिकेने दुर्लक्ष केलेले आहे. हे लोक तेथेच घाण करतात व काही अंतरावर जेवण करताना दिसून आल्याचे ते म्हणाले. जागोजागी कचर्याचे ढीग पसरलेले असतात.