म्हापसा पालिकेत सत्तांतराचे संकेत

0
17

हापसा नगरपालिकेच्या नगरसेविका डॉ. नूतन बिचोलकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आता म्हापसा पालिकेचे नगराध्यक्षपद डॉ. बिचोलकर तर उपनगराध्यक्षपदाची माळ विराज फडके यांच्या गळ्यात पडणार असल्याची चर्चा आहे. याबाबत नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांना प्रतिक्रिया विचारली असता त्या म्हणाल्या की, नूतन डिचोलकर यांचे पक्षात स्वागत आहे. पक्ष मजबूत बनविण्यासाठी अन्य नगरसेवकांनीही भाजपात यावे, असे आवाहन त्यांनी केले. आपणास याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे तसेच अन्य नेत्यांनी काहीच कल्पना दिली नाही. आपल्याकडे आमदारही बोलले नाहीत. नगराध्यपक्ष पदासाठी एक वर्षाचा करार होता खरा, मात्र त्याबाबत पुढे काहीच बोलणी झालेली नाही. भाजपचा आपल्याला पूर्ण विश्वास आहे. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष व आमदार आपला कधीही विश्वासघात करणार नाही, असे नगराध्यक्ष वायंगणकर म्हणाल्या. दरम्यान, एका नगरसेवकाने दिलेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्य दिनाच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे १६ ऑगस्टला नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर व उपनगराध्यक्ष शेखर बेनकर हे दोघेही आपल्या पदाचा राजीनामा देणार असून त्या जागी नगराध्यक्षपदी डॉ. नूतन बिचोलकर तर उपनगराध्यक्ष विराज फडते यांची वर्णी लागण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. तर म्हापसा मार्केट अध्यक्षपदी आशीर्वाद खोर्जुवेकर यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.