आपल्याविरोधात काही नगरसेवक बंडाच्या तयारीत असल्याची चाहूल लागताच शुभांगी वायंगणकर यांनी काल म्हापसा पालिकेच्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. म्हापसा मतदारसंघाचे आमदार आणि उपसभापती ज्योशुआ डिसोझा यांनी केलेल्या सूचनेनंतर आपण राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले.
म्हापसा पालिका निवडणुकीनंतर विरोधी गटातून निवडून आल्यानंतर त्यांनी सत्ताधारी गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांची या पदावर निवड करण्यात आली होती. ११ महिने त्या नगराध्यक्षपदावर राहिल्यानंतर त्यांनी अंतर्गत बंडाळीनंतर पायउतार होण्याचा निर्णय घेतला.
एका वर्षापूर्वी आमदारांनी आपल्याला राजीनामा देण्याची सूचना केली होती, तेव्हा काही कामे अपूर्ण राहिल्याने आपण राजीनामा दिला नव्हता. आमदारांनी केलेली सूचना मान्य करावी, असा आदेश पक्षाने केल्यामुळे आपण राजीनामा दिला आहे. आपल्यावर राजीनाम्यासाठी दबाव नव्हता. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला असून, यापुढेही आपले काम सुरुच राहणार आहे. नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीवर आपण समाधानी आहे, अशी प्रतिक्रिया शुभांगी वायंगणकर यांनी दिली.