म्हापसा नगरपालिकेच्या प्रभाग 7 चे नगरसेवक तारक आरोलकर यांना बोगस ओबीसी प्रमाणपत्र प्रकरणी अपात्र ठरविण्यात आल्याने त्या रिक्त जागेवर येत्या जुलैमध्ये पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने या रिक्त जागेवर पोटनिवडणूक घेण्यासाठी निवडणूक अधिकारी आणि साहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करणारा आदेश काल जारी केला.
तारक आरोलकर हे ओबीसींसाठी राखीव असलेल्या प्रभागातून निवडणूक लढवून विजयी झाले होते. पालिका निवडणूक निकालानंतर फ्रान्सिस कुएलो यांनी आरोलकर यांच्याविरोधात बोगस ओबीसी प्रमाणपत्र प्रकरणी तक्रार दाखल केली होती. चौकशीमध्ये तारक आरोलकर यांचे ओबीसी प्रमाणपत्र बोगस असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आरोलकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेऊन दिलासा मिळविण्याचा प्रयत्न केला होता; मात्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली होती.
आरोलकर यांचा ओबीसी दाखला म्हापसा येथील उपजिल्हाधिकाऱ्यांनी मागे घेतल्यानंतर नगरपालिका संचालकांनी त्यांना अपात्र घोषित केले. आता या जागेवर पोटनिवडणूक घेण्यासाठी म्हापसा येथील उपजिल्हाधिकारी यांची निवडणूक अधिकारी, तर म्हापसाचे मामलेदार यांची साहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
3 पंचायतींच्या 3 प्रभागांत2 जुलै रोजी पोटनिवडणूक
राज्यातील तीन ग्रामपंचायतीच्या तीन प्रभागांत येत्या 2 जुलैमध्ये पोटनिवडणूक घेतली जाणार आहे, असे पंचायत सचिव मिनिनो डिसोझा यांनी जाहीर केले आहे. सासष्टी तालुक्यातील धर्मापूर-शिरली पंचायतीच्या प्रभाग 2, तिसवाडी तालुक्यातील सांत इस्तेव पंचायतीच्या प्रभाग 5 (ओबीसी) आणि पेडणे तालुक्यातील पार्से पंचायतीच्या प्रभाग 7 साठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.