‘काम्र म्युनिसिपाल-द-बार्देस’कडून आपण सरळ आलो आणि ‘आद्मिस्त्रासांव-द-कोमिनीदादीश’ इमारतीजवळील चौकात पोचलो की एक रस्ता पूर्व दिशेला असलेल्या ‘दि त्रिबुनाल ज्युदिसिआल द कोमार्का-दे-बार्देस’ या पोर्तुगीजकालीन न्यायालयाच्या दिशेने जातो. दिवाणी आणि फौजदारी स्वरूपाचे खटले या न्यायालयात चालत असत. हे तत्कालिन जिल्हा न्यायालय होते. या न्यायालयाच्या इमारतीची रचना म्हणजे वास्तुशिल्पाचा एक उत्कृष्ट नमुना होता. गोवा मुक्तीनंतर या इमारतीचा विस्तार करण्यात आला असला तरी या इमारतीच्या सौंदर्याला कुठंही बाधा येणार नाही याची वास्तुशिल्पकारांनी काळजी घेतली असल्यामुळे आजही या इमारतीचं सौंदर्य टिकून आहे.
इतिहासाचा मागोवा घेताना आपण यापूर्वीच पाहिलं आहे की, दिनांक २७ फेब्रुवारी १५१० रोजी ‘तिमोजी’ नावाच्या चाचाच्या मदतीने ‘आल्फोंस-दे-आल्बुकेर्क’ या पोर्तुगीज सेनापतीने समुद्रमार्गे येऊन गोमंतकावर हल्ला केला व गोवा बेट जिंकून घेतले. पोर्तुगालमध्ये त्यावेळी हुकूमशाही राजवट होती. पुढे पोर्तुगालमध्ये राज्यक्रांती होऊन इ.स. १९१० साली लोकसत्ताक राजवट आली. त्यानंतर पोर्तुगीज राजसत्तेने समुद्रापार असलेल्या आपल्या ताब्यातील वसाहतींना प्रांतसरकारचा दर्जा दिला. गोव्याचाही या ‘प्रांता’मध्ये समावेश होता. पोर्तुगिजांची वसाहत बनलेल्या गोवा प्रांताच्या न्यायव्यवस्थेचा एक भाग म्हणून गोमंतकाची विविध जिल्ह्यांमध्ये विभागणी करण्यात आली होती. बार्देस, डिचोली, तिसवाडी, केपे, सालसेत, गुजरातजवळील दमण व दीव अशी या जिल्ह्यांची विभागणी करण्यात येऊन दिवाणी व फौजदारी न्यायालयांची स्थापना करण्यात आली होती. मुरगाव व फोंडा या भागांसाठी गौण स्वरूपाची पालिका न्यायालये स्थापन करण्यात आली होती. त्यांना ‘जुल्गादोस म्युनिसिपाथीश’ असं म्हणत असत.
स.स. १९३७ दरम्यान उच्च न्यायालयाबरोबरच आणखी तीन न्यायालयांची स्थापना करण्यात आली होती. बार्देस, तिसवाडी आणि सालसेत विभागांसाठी स्थापन करण्यात आलेल्या या न्यायालयांना ‘जुय्ज-दे-दिरैतू’ असं म्हणत असत. या न्यायालयाच्या स्थापनेमुळे बार्देस तालुक्यातील न्यायव्यवस्थेला उच्च दर्जा प्राप्त झाला, असे तत्कालीन नागरिक मानत असत.
बार्देस जिल्हा न्यायालयीन व्यवस्थेचे प्रमुख न्यायालय म्हापसा येथे होते. जाणकारांकडून मिळालेल्या माहितीनुसार ‘बॅरिस्टर आंतोनिओ बेर्नादो-दे-ब्रागांझा परैरा’ यांची २६ नोव्हेंबर १९२१ रोजी या जिल्हा न्यायालयाचे पहिले न्यायाधीश म्हणून पोर्तुगीज शासनाने नियुक्ती केली होती. इ.स. १९२३ मध्ये न्यायालयाची इमारत बांधण्यात आली. जाणकारांच्या मते, या न्यायालयात शासनाने बॅरिस्टर शिवराम बळवंत राव यांची बार्देस जिल्हा न्यायालयाचे पहिले ‘पब्लिक प्रॉस्युक्युटर’ (सरकारी वकील) म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर इ.स. १९४३ मध्ये शासनाने त्यांची बार्देस जिल्हा न्यायालयाचे प्रथमश्रेणी न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली होती.
बार्देस जिल्हा न्यायालयाच्या या इमारतीच्या खालच्या बाजूला पूर्वी गाळेवजा इमारती होत्या. या इमारतींच्या छोट्या-छोट्या खोल्यांमधून पोर्तुगीज कर्मचार्यांची व सैनिकांची कुटुंबे वास्तव्य करून असत. काही खोल्या पोर्तुगीज सैनिक झोपण्यासाठी व ऊठ-बस करण्यासाठी वापरत असत. आज या ठिकाणी ‘झेविअर ऍन्क्लेव्ह’ नावाची तीन मजली इमारत उभी आहे. ही जागा मुंडकार कायद्याखाली पाच-सहा कुटुंबीयांच्या वाट्याला आली होती. ती त्यांनी हळदोणे येथील एक बिल्डर जुझे रॉड्रिगीश यांना विकसित करण्यासाठी दिली होती. या इमारतीच्या तळमजल्यावर आज एक चारचाकी वाहनदुरुस्ती करणारं आस्थापन असून बाजूलाच आमचे एक विद्यार्थी आणि म्हापशातील एक समाजसेवक व पुस्तकविक्रेते श्री. चंद्रकांत पंडित यांचे चिरंजीव श्री. नीतेश पंडित यांचे ‘ग्राफिक्स हाऊस’ हे आस्थापन आहे.
जिल्हा न्यायालयाकडून पेडे येथील जिल्हा इस्पितळाकडे जाणार्या रस्त्याच्या पल्ल्याड ‘आद्मिस्त्रासांव-द-कोमुनिदादीश’च्या इमारतीसमोर ‘तार’ कुटुंबीयांची तीन मजली इमारत आहे. त्या इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर लग्नकार्य, मुलांचे वाढदिवस व इतर कार्यक्रमांसाठी भाड्यानं उपलब्ध असलेलं ‘त्रिमूर्ती’ हे सुसज्ज असं सभागृह आहे. या इमारतीच्या बाजूलाच एक जुन्या वळणाचं कॅथोलिक कुटुंबीयांचं कौलारू घर आहे. घरासमोर ऐसपैस अशी मोकळी जागा आहे. या घराकडून जुन्या ‘देलागाद-द-साऊद’कडे (सरकारी आरोग्य केंद्र) जाणार्या रस्त्याच्या पल्ल्याड ‘नातालिना’ ही बहुमजली इमारत असून तळमजल्यावर विविध प्रकारची आस्थापने आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा न्यायालयाच्या बाजूलाच ‘पिंटो’ कुटुंबीयांनी आपलं जुनं घर पाडून ‘लुईस ओलिव्ह अपार्टमेंट्स’ ही तीन मजली इमारत उभारली आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर बँक तसेच इतर आस्थापने कार्यरत असून वरच्या मजल्यावर वकील व इतरांच्या कचेर्या आहेत. ‘पिंटो’ कुटुंबीयांपैकी श्री. लेस्ली पिंटो हे कॅनडात स्थायिक झाले असून थॉमस हा दिवंगत झाला आहे. शिवाय त्यांचा आणखी एक बंधू परदेशात स्थायिक झाला आहे. श्री. लेस्ली हा माझा वैयक्तिक स्नेही आहे.
‘नातालिना’ आणि ‘लुईस ओलिव्ह अपार्टमेंट्स’ या इमारतींच्या मध्यभागी एक लहान ‘फेअर आल्त बगीचा’ होता. पूर्वी या बागेत भलं मोठं पिंपळाचं झाड होतं. या बगिच्याला ‘ऑलेम्पिक गार्डन’ असंही म्हणत असत. पूर्वी या ठिकाणी ‘मोसिदादी पोर्तुगेज’ या युवा संघटनेच्या शैक्षणिक संस्थेमध्ये सक्तीचं असलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणासाठी आणलं जात असे. गोवा मुक्तीनंतर ‘म्हापसा फेस्त’ या नावाचा एक करमणुकीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी या बागेचं नूतनीकरण करण्यात आलं होतं. बालकांना खेळण्यासाठी या बागेत क्रीडासामानाची सोय करण्याबरोबरच संध्याकाळच्या वेळी फेरीसाठी येणार्या वयोवृद्धांना बसण्यासाठी व विश्रांती घेण्यासाठी सिमेंटच्या बाकांचीही सोय करण्यात आली आहे. या बगिच्यामध्ये ‘ऑलेम्पिक’मध्ये असलेल्या स्मारकासारखे एक बांधकाम असल्यामुळे या बागेला ‘ऑलेम्पिक गार्डन’ या नावाने ओळखले जात असावे असे मला वाटते. या बगिच्याला ‘ऑलेम्पिक गार्डन’ म्हणतात हे फारच थोड्या लोकांना ठावूक असेल.