म्हापसा अर्बन बँकेच्या गैरकारभाराची चौकशी करा ही मागणी धसास लावण्यासाठी बँकेच्या ठेवीदारांतर्फे सोमवार दि. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वा. म्हापसा येथील बँकेच्या मुख्य कार्यालयापुढे दोन तास धरणे धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बँकेचे खातेदार तसेच ठेवीदारांनी या धरण्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
म्हापसा अर्बन बँकेच्या कारभारावर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातल्यास आता पाच वर्षे होत आली आहेत. हे निर्बंध १८ फेब्रुवारी रोजी संपत आहेत. त्यानंतर बँकेची परिस्थिती काय होईल हे कळण्यास काहीच मार्ग नाही. ठेवीदारांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश न आल्याने संचालक मंडळाविरुद्ध पणजी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तसेच रिझर्व्ह बँकेकडेही तक्रार करण्यात आली आहे. जीएमसी बँकेच्या धर्तीवर म्हापसा अर्बन प्रशासक नेमावा अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनाही देण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांमुळे हजारो लोकांच्या ठेवी बँकेत अडकून पडल्या आहेत व त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे सरकारने संचालकांविरुद्ध कारवाई करावी म्हणून धरणे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सर्व ठेवीदारांनी या धरणे कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.