एकतानगर, म्हापसा येथील एका घराचा सेप्टिक टँक स्वच्छ करण्यासाठी त्यात उतरलेल्या एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. यमनाप्पा मदार (24, रा. लक्ष्मीनगर-म्हापसा, मूळ रा. बेळगाव) असे मृत कामगाराचे नाव आहे. गुदमरल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. ही घटना गुरुवारी रात्री 12.15 च्या सुमारास घडली. म्हापसा पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून या घटनेची नोंद केली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, एकतानगर भागातील गृहनिर्माण मंडळाच्या वसाहतीजवळील एका घराचा सेप्टिक टँक रिकामी करण्याचे काम काल रात्री चार कामगारांनी हाती घेतले होते. त्यातील यमनाप्पा हा कामगार टँकमध्ये उतरला होता. टँकचे तोंड अरुंद आणि खोली साधारण 4 मीटर खोल आहे. त्यातून तो आतमध्ये गेला आणि काही वेळात बेशुद्ध होऊन खाली पडला. त्याला बाहेर काढण्यासाठी दुसरा कामगार आत उतरला; मात्र श्वास कोंडू लागल्याने तोही लगेच वर आला. अखेर म्हापसा अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. दलाचे जवान तिथे पोहोचले असता टँकचे तोंड अगदीच छोटे असल्याचे, तसेच आत घातक वायू साठून राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले. अथक प्रयत्नानंतर यमनाप्पाचा मृतदेह बाहेर काढला.