>> तिघांना अटक; दुचाकीस्वारालाही लुटले
म्हापसा शहरात काल पहाटे एका तरुणाने दारुच्या नशेत हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी संशयित जेम्स डिसोझा याच्यासह त्याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. हवेत गोळीबार करण्यापूर्वी या टोळक्याने एक व्यक्तीला वाटेत अडवून त्याला लुटले. त्या प्रकरणी देखील तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जेम्स डिसोझा हा आपल्या दोन मित्रांसोबत कारने पर्वरीहून म्हापशाकडे येत होता, त्याचवेळी गिरीजवळील फ्लायओव्हरवर एका दुचाकीस्वाराला अडवले. आपण नार्कोटिक पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करत खिशातील पिस्तुल काढून त्या दुचाकीस्वारावर रोखले. त्यानंतर त्याला मारहाण करत त्याच्याकडून मौल्यवान वस्तू काढून घेतल्या.
या घटनेनंतर हे तिघेही म्हापसा शहरात आले. तेथे त्यांनी मद्यपान केले. तिथून बाहेर पडताना त्यांनी सिंडिकेट बँकेजवळ दारुच्या नशेत हवेत गोळीबार केला. या घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांना घटनास्थळी बुलेटचे शेल सापडले. त्याच दरम्यान सदर दुचाकीस्वार नावेद शेख यांनी नोंद केलेल्या तक्रारीच्या आधारावर जेम्स डिसोझा याच्यासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली.