म्हापशात आगीमुळे दोन दुकाने खाक

0
6

>> 70 लाख रुपयांचे नुकसान

म्हापसा सेंट झेवियर कॉलेजकडून गणेशपुरी म्हापसा हाउसिंग बोर्ड येथे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका लॉन्ड्री व स्टेशनरी दुकानाला आग लागून सुमारे 70 लाख रुपयांचे नुकसान झाले. ही आग कशा पद्धतीने लागली याचा सुगावा अजून लागलेला नाही. ही घटना शनिवारी दि. 21 रोजी रात्री 11 नंतर घडल्याचे म्हापसा अग्निशामन दलाने सांगितले.

स्टेशनरी दुकानाचे मालक ललित तिवारी यांच्या दुकानांमध्ये असलेली 4 झेरॉक्स मशीन, 4 प्रिंटर, 4 लॅपटॉप त्याचप्रमाणे स्टेशनरीसाठी लागणारया वह्या, पेन पेन्सिल व इतर साहित्य पूर्णतः जळून खाक झाले. हा गाळाही पूर्ण जळून गेल्याने त्यांचे सुमारे 40 लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे. त्यांच्याच बाजूला असलेले रोहित नाईक यांची लॉन्ड्री जळून तीही पूर्णतः खाक झाली. यामध्ये साड्या, तसेच इतर शर्ट, पॅन्ट, तसेच इतर कपडे मोठ्या प्रमाणात होते. त्यांचे अंदाजे 30 लाख रुपयांचे नुकसान झाले असावे. या दोन्ही दुकानांचे मिळून 70 लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे.

आग लागण्यापूर्वी या दोन्ही दुकानमालक दुकानांची दारे बंद करून जेवणासाठी घरी गेले होते आणि त्यानंतर कोणीतरी त्यांना दुकानांना आग लागल्याची माहिती दिली. त्यानंतर दोघेही दुकानदार रोहित नाईक व ललित तिवारी घटनास्थळी धावून आले. त्योवळी त्यांना दुकान जळत असल्याचे दिसून आले.
याबाबत त्वरित म्हापसा अग्निशामक दलाला कळवण्यात आले त्यावर म्हापसा अग्निशामकच्या जवानांनी पाण्याचे बंब आणून आग विझवण्यास सुरूवात केली मात्र त्यांना ही आग आटोक्यात येऊ शकली नाही. अखेर त्यांनी पर्वरी अग्निशामक दलाला पाचारण केले. मात्र तोवर दोन्ही गाळे पूर्णतः जळून खाक झाले होते.