म्हापशातील दुकान फोडून ४ लाखांचे दागिने लंपास

0
191
म्हापसा येथील एस. एस. ज्वेलर्स या दुकानातील दृश्य. (छाया : प्रणव फोटो)

येथील हनुमान मंदिरामागील एस. एस. ज्वेलर्स हे दागिन्याचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून ४ लाख रुपयांचे दागिने पळविण्याची घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याविषयी पोलीस तक्रार नोंदविण्यात आली आहे. रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानांच्या पुढील शटर्सची कुलुपे तोडून आणि आतील काचेच्या दरवाजाची काच फोडून आत प्रवेश केला आणि आतील ४ लाख रुपये किंमतीच्या सोन्या-चांदीच्या वस्तू चोरून नेल्या.चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी दुकानाच्या बाहेर पेटत असलेली ट्युब लाईट फोडून प्रथम काळोख केला आणि नंतर शटर्सची कुलुपे तोडली. ती तोडल्यावर शटर्स वर केले आणि आतील काचेचा दरवाजा होता तो त्या दरवाजाची काच फोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. आतील सोन्याचे तोडे, हार, सोनसाखळी तसेच चांदीच्या समई व इतर सोन्या-चांदीच्या वस्तू मिळून ४ लाख रुपये किंमतीच्या वस्तू लंपास केल्या.
दुकानाच्या मालकीण शर्मिला आरसेकर यांचे पती सतीश आरसेकर हे काल सकाळी ७.३० वा. दुकानात आले असता चोरी झाल्याचे उघडकीस आले. त्यांनी म्हापसा पोलिसात तक्रार दिली असता पोलीस उपनिरीक्षक जितीन पोतदार यांनी आपल्या इतर सहकार्‍यांसहीत घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. श्‍वानपथकानाही प्राचारण करण्यात आले. परंतु चोरटे अजून सापडू शकले नाही.
केणीवाडयावर घरफोडी
दरम्यान, केणीवाडा-म्हापसा येथील रवळनाथ शिरोडकर यांच्या बंद घराच्या पुढील दाराचे कुलूप तोडून रविवारी रात्री चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि आतील बॅगेमधील ७०० रुपये व इतर देवपूजेच्या वस्तू चोरून नेल्या. तसेच कपाट उघडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. कपाट उघडू शकले नसल्याने इतर वस्तू त्यांच्या हाती लागले नाही. शिरोडकर कुटुंबीय देवदर्शनासाठी शनिवारी संध्याकाळी ६ वा. कुडाळ येथे गेले होते आणि काल सकाळी ७.१५ वाजता घरी आले असता घराचे पुढील दार उघडे असल्याचे त्यांना दिसले. चोरट्याने पुढील गेटचे कुलूप तोडले. नंतर दाराची कडी तोडून आत प्रवेश केला होता.