म्हादईप्रश्नी प्रदीर्घ कालावधीनंतर म्हादई जललवादासमोर आज बुधवारपासून कळसा कालव्याबाबत सुनावणी नव्याने सुरू होत आहे. गोव्याची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी गोव्याचे जलसिंचन खात्याचे मुख्य अभियंता सदीप नाडकर्णी, सल्लागार चेतन पंडित, अतिरिक्त मुख्य अभियंता प्रेमानंद कामत, अधीक्षक अभियंता श्रीकांत पाटील व अन्य अधिकार्यांचा चमू मंगळवारी दिल्लीत दाखल झाला आहे.
महाराष्ट्र सरकारने विर्डी धरण प्रकल्पाचे कामकाज गोव्याला विश्वासात न घेता एकतर्फी चालवलेले आहे. त्याबाबत गोव्याने हरकत घेतलेली असून याचिका लवादासमोर सादर केली आहे. या संदर्भात लवाद हा विषय सुनावणीला घेण्याचीही शक्यता आहे. शक्यता आहे.
यापूर्वी लवादाने कर्नाटकाला कळसा कालव्याची जलप्रभेत जाणारे दोन्ही मार्ग बंद करण्याचा आदेश दिला होता. त्याच्या कामाचा अहवाल तीन अभियंत्याच्या समितीने निबंधकांना सादर केला होता. या अहवालबाबत चर्चा होण्याची शक्यता असून यापुढे कर्नाटक कोणती भूमिका मांडणार आहे, याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. याप्रश्नी गोव्याच्या भूमिकेने आक्षेप घेतला तर त्याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी काही कालावधी मागून घ्यावा लागेल. मलप्रभा कृष्णेची उपनदी असून गोवा सरकारचे अधिकारी कृष्णा लवादाला भेट देऊन मलप्रभेच्या प्रकल्पाबाबत अभ्यास करणार आहे. गोव्याचे अतिरिक्त अभियंता श्रीकांत पाटील यांनी राज्याची भूमिका प्रभावीपणे मांडण्यासाठी सर्व प्रयत्न केले असून गोव्याचे लवादाकडून रक्षण व्हावे, राज्याला न्याय मिळावा यासाठी तयारी झाल्याचे सांगितले. नवी दिल्लीत आज होणार्या सुनावणीत कर्नाटक कोणते नवे मुद्दे उपस्थित करणार, लवाद हल्लीच दिलेल्या अभियंत्याच्या अहवालाबाबत व त्यानंतर विर्डी धरण व इतर आक्षेपाबाबत काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून असल्याचे जलसिंचन मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी सांगितले.