केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने म्हादई जल व्यवस्थापन प्राधिकरणावर (म्हादई प्रवाह) तीन सदस्यीय समितीची नियुक्ती केली आहे, अशी माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत दिली.
पी. एम. स्कॉट यांची या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर समितीच्या सचिवपदी अशोक कुमार यांची नियुक्ती करण्यात आली असून, सदस्यपदी केंद्रीय जल आयोगाचे मुख्य अभियंते वीरेंद्र शर्मा यांची नियुकती करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने दोन महिन्यांपूर्वी म्हादई जल व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना केली होती. म्हादईच्या पाण्याचे योग्य प्रकारे वाटप व्हावे व म्हादईचे पाणी बेकायदेशीररित्या वळवले जाऊ नये यासाठी जलशक्ती मंत्रालयाने म्हादई जल व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना केली होती. या प्राधिकरणाचे मुख्यालय पणजीत स्थापना करण्यात येणार असल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केलेले आहे.