म्हादई प्रश्‍नावर गोव्याची उद्या लवादासमोर अवमान याचिका

0
125

कर्नाटकाने म्हादईचे पाणी बेकायदा अडविले असून या कृतीची गंभीर दखल घेत गोवा सरकारने कर्नाटकाविरोधात म्हादई जलतंटा लवादासमोर अवमान याचिका दाखल करण्याचे ठरविले आहे. उद्या मंगळवारी सदर अवमान याचिका सादर केली जाणार आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी काल दिली.

म्हादई जलतंटा लवादाने म्हादईचे पाणी वळविण्यास आक्षेप घेतला आहे. तरीही कर्नाटकाने लवादाच्या आदेशाला न जुमानता पाणी वळविले आहे. राज्य सरकारने कर्नाटकाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. आता, म्हादई लवादासमोर अवमान याचिका दाखल केली जाणार आहे.
भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी कर्नाटकाच्या विरोधात अवमान याचिका दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती यापूर्वी दिलेली आहे.

म्हादई लवादाने यापूर्वी स्थगिती देऊनही कर्नाटकने लवादाच्या निर्णयाचा अनादर करून कशा पद्धतीने पाणी वळविण्याचा घाट घातला, हे अवमान याचिकेतून निदर्शनास आणून दिले जाणार आहे. तसेच म्हादईच्या नैसर्गिक प्रवाहामध्ये अडथळा निर्माण करून पाणी आपोआप कर्नाटकच्या बाजूने वळावे म्हणून प्रयत्न केले आहेत. ही बाब लवादाच्या निदर्शनास आणून दिली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
म्हादई जलतंटा लवादाने म्हादई प्रकरणी आपला निवाडा जाहीर केला आहे. या निवाड्याची कार्यवाही कर्नाटककडून कशा पद्धतीने केली जाते याकडे लक्ष ठेवले जाणार आहे. म्हादई प्रकल्पासाठी पर्यावरण परवाने सक्तीचे करण्यात आल्याने प्रकल्पाचे काम मार्गी लावताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.