म्हादई : पाहणीनंतर गोव्याची बाजू मजबूत होणार

0
7

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून विश्वास व्यक्त; सत्य उजेडात येणार; कर्नाटकात 7 जुलै रोजी होणार पाहणी

कर्नाटक सरकारने म्हादई नदीचे पाणी वळविण्यासाठी केलेल्या कामाची म्हादई प्रवाह प्राधिकरणाच्या सदस्यांनी पाहणी केल्यानंतर सत्य समोर येणार आहे. प्राधिकरणाच्या पाहणीनंतर गोव्याची बाजू आणखी मजबूत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल व्यक्त केला.
आमच्या सततच्या प्रयत्नांमुळे प्रवाह प्राधिकरणाने म्हादईची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा राज्यासाठी ही पाहणी महत्त्वाची आहे. पाहणीअंती प्रवाह प्राधिकरणाच्या सदस्यांना खरी बाजू कळणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

काल म्हादई प्रवाह प्राधिकरणाच्या सदस्यांनी डिचोली, सत्तरी व बार्देश तालुक्यांत पाहणी केली. यावेळी गोवा जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनी म्हादई नदीच्या पाण्यावर गोवा कसा अवलंबून आहे आणि गोव्यासाठी ही नदी किती महत्त्वाची आहे, हे सदस्यांच्या निदर्शनास आणून दिले. या पाहणीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

प्रवाह प्राधिकरणाकडून 7 जुलै रोजी कर्नाटकात म्हादईची पाहणी केली जाणार आहे. चोर्ला-कर्नाटक सीमाभाग, हलतरा नाला, सुर्ला नाला, कुणकुंबी-कळसा नाला, नेर्से, कोटनी धरण जागा, भांडुरा नाल्याची पाहणी केली जाणार आहे. कळसा, भांडुरा प्रकल्पाच्या जागांची पाहणी, म्हादई नदीवरील हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पाच्या जागेची पाहणी केली जाणार आहे. प्रवाह समितीची दुसरी बैठक 8 जुलै रोजी दुपारी बंगळुरू येथे होणार आहे. तत्पूर्वी, प्रवाह समितीकडून गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात म्हादई नदीची पाहणी केली जाणार आहे.

म्हादई प्रवाह प्राधिकरणाकडून 3 तालुक्यांत पाहणी

गोवा, महाराष्ट्र व कर्नाटक तीन राज्यांतील म्हादई खोऱ्याची प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या हेतूने गुरुवारी म्हादई प्रवाह प्राधिकरणाच्या सदस्यांनी सत्तरी, डिचोली, बार्देश तालुक्यातील भेट देऊन पाहणी केली. काल सकाळी त्यांनी मेणकुरे येथील आमठाणे धरण, केरी येथील अंजुणे धरण आणि साखळी येथील बंधाऱ्यांना त्यांनी भेटी दिल्या.

अस्नोडा, पडोसे, साखळी आदी जलशुध्दीकरण प्रकल्पांना होणारा पाणीपुरवठा हा म्हादई व उपनद्यांवर अवलंबून आहे. तसेच गोव्यातील लोकजीवन, अभयारण्य, पर्यावरण या नदीवर अवलंबून असल्याचे जलसंपदा खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी म्हादई प्रवाह प्राधिकरणाच्या सदस्यांच्या निदर्शनास आणून दिले.
सत्तरी तालुक्यातील उस्ते गावात ‘नानोडा’ नावाने ओळखला जाणाऱ्या नाल्याचा संगम मुख्य म्हादईशी होतो, त्या जागेलाही सदस्यांनी भेट दिली
आपल्या भेटीत हे सदस्य ओपा जलप्रकल्प, गांजे जलप्रकल्प त्याचप्रमाणे कुंभारजुवा कालवा आणि अन्य महत्त्वाच्या पर्यावरणीय परिसंस्थांची पाहणी करणार आहेत.
महाराष्ट्रातील विर्डी गावात उभारण्यात झालेल्या धरणाची व प्रस्तावित प्रकल्पांची पाहणी केल्यानंतर हे सदस्य कर्नाटकातील कणकुंबी गावातील कळसा, हलतरा, सुर्ला या प्रकल्पांची त्याचप्रमाणे कोटणे जलसिंचन प्रकल्पाची पाहणी करणार आहेत.
कालच्या दौऱ्यावेळी म्हादई प्रवाह प्राधिकरणाचे अध्यक्ष उपस्थित राहिले नाहीत, त्याबद्दल पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र केरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रवाहाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक जलस्त्रोत खात्याच्या अभियंत्यांबरोबरच तज्ञ मंडळींनी या दौऱ्यात सहभागी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी
सांगितले.