अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा
कर्नाटक सरकारने म्हादई नदीतील आपल्या वाट्याचे 3.9 टीएमसी पाणी कळसा-भांडुरा नाल्यातून वळवण्यासाठीची योजना तयार केली आहे. शुक्रवारी आपल्या अर्थसंकल्पातून सिद्धारमय्या यांनी त्यासंबंधीची घोषणा केली आहे. सदर योजना तयार असून आता फक्त पर्यावरणीय मंजुरीची प्रतीक्षा असल्याचे सिद्धारमय्या यांनी स्पष्ट केले आहे. या कामासाठीचे कंत्राटही यापूर्वीच देण्यात आले असल्याचे सिद्धारमय्या यांनी स्पष्ट केले आहे. हे पाणी वळवण्यासाठी काही अटी असतील असे सांगून त्यासाठीच्या आवश्यक त्या सगळ्या मान्यता केंद्र सरकारकडून मिळाल्यानंतर काम सुरू होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
परवान्यासाठी दिल्ली वाऱ्या
दरम्यान, या कामासाठी पर्यावरणीय परवाना मिळवण्यासाठी कर्नाटक सरकारच्या दिल्ली वाऱ्या सध्या सुरू आहेत. यापूर्वी कर्नाटक राज्यात भाजप सरकार सत्तेवर असतानाही त्यांनी कळसा-भांडुरा नाल्याच्या कामाला वेग आणला होता. आता राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर आलेले असून हे सरकारही तेव्हाच त्वेषाने व गतीने हे काम पुढे नेताना दिसत आहे. या प्रकल्पावरून उत्तर कर्नाटकातील राजकारण तसेच समाजकारण अनेकवेळा तापले आहे. मात्र, सध्या वातावरण शांत असले तरी लवकरच होणाऱ्या पंचायतीच्या निवडणुकात उत्तर कर्नाटकातील काही भागांत म्हादईच्या प्रश्नाला पुन्हा गती मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.