>> पेडण्यात कॉंग्रेसतर्फे म्हादईप्रश्नी आंदोलन
केंद्रातील आणि गोव्यातील भाजप सरकार गोव्याचे पर्यावरण नष्ट करु पाहत आहे. कर्नाटकातील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्य व केंद्र सरकारने म्हादई नदीचा सौदा करू पहात आहे. याला कॉंग्रेस पक्षाचा तीव्र विरोध करेल असे प्रतिपादन गोवा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पेडणे येथे केले.
कळसा भांडुरा प्रकल्पाला केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरण दाखला दिल्याप्रकरणी गोवा कॉंग्रेसतर्फे काल शुक्रवार दि. १ नोव्हेंबरपासून म्हादईबाबत तालुका पातळीवर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार काल शुक्रवारी पेडणे तालुक्यातून या आंदोलनाला सुरुवात झाली. कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांनी पेडणे उपजिल्हाधिकारी चंद्रकांत शेटकर यांची भेट घेऊन केंद्राने पर्यावरण दाखला त्वरित मागे घ्यावा या संबंधीचे निवेदन सादर केले. यावेळी अध्यक्ष गिरीश चोडणकर, माजी शिक्षणमंत्री संगीता परब, उत्तर गोवा अध्यक्ष विजय भिके, ट्रॉजन डिमेलो, उपाध्यक्ष बाबी बागकर, कार्यकारिणी सदस्य सुभाष केरकर, प्रवक्ते अमरनाथ पणजीकर, पेडणे गटाध्यक्ष उमेश तळवणेकर व इतर कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. श्री. चोडणकर पुढे म्हणाले की, म्हादई ही गोव्याची जीवनदायिनी आहे. त्यामुळे म्हादई बचावासाठी सर्वांनी एक होऊन आंदोलन करावे लागणार आहे. पेडण्यातून आज ही म्हादई बचावासाठी आंदोलनाची सुरूवात होत असून म्हादईच्या चळवळीला निश्चितच यश मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी चोडणकर यांनी, जावडेकर हेच म्हादईच्या विषयात मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप करत म्हादईचा विषय सर्वोच्च न्यायालयात असताना पर्यावरण खात्याचे पत्र पाठवून कर्नाटक सरकारला झुकते माप दिले आहे. अशा व्यक्तीला परत भेटून काही फायदा होणार नाही. यासाठी पंतप्रधान व राष्टपती यांनाच शिष्टमंडळाने भेटावे अशी मागणी केली.
खास अधिवेशनाची मागणी
यावेळी चोडणकर म्हणाले विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केलेल्या मागणीनुसार म्हादई विषयावर एक खास एकदिवशीय अधिवेशन बोलवून त्यात चर्चा करुन नंतर सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्ली येथे न्यावे अशी मागणी केली आहे.
संगीता परब यांनी या प्रश्नी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वेळीच हस्तक्षेप करावा अशी मागणी केली. यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले.