>> सभापती डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह आमदारांची कणकुंबीला भेट
म्हादईचा गोव्याकडे येणारा पाण्याचा प्रवाह पूर्ण बंद झाला असून सार्या वाटा बंद झालेल्या आहेत. त्यामुळे गोव्याला भीषण संकटाचा सामना करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले असून आता जागृत लढाई लढण्याची तसेच कडक भूमिका घेण्याची गरज निर्माण झाल्याचे सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी कणकुंबी येथे सांगितले. सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी उपसभापती मायकल लोबो, आमदार एलिना साल्ढाना, प्रसाद गावकर, माजी आमदार मोहन आमशेकर, ऍड. बाबुसो गावकर, नरहरी हळदणकर, सायमन डिसोझा विनयकुमार उसगावकर यांच्यासमवेत सुमारे १०० लोकांना व पत्रकारांना घेऊन कणकुंबी येथे दौरा केला व प्रत्यक्ष पाहणी केली.
म्हादईसाठी सतत कार्यरत असलेल्या राजेंद्र केरकर यानी कणकुंबी परिसरात कर्नाटकाने कशा प्रकारे म्हादई उध्वस्त करण्याचा सपाटा लावताना बेकायदा गोष्टी केलेल्या आहेत याची सविस्तर माहिती सभापती व आमदारांच्या शिष्टमंडळाला दिली.
सुमारे चार तासांच्या पाहणीनंतर गोव्याच्या आमदारांनी कर्नाटकाने चालवलेल्या कृतीचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. आता गोव्याला गंभीर धोका निर्माण झाल्याचे लक्षात आल्याचे डॉ. प्रमोद सावंत, मायकल लोबो, एलिना साल्ढाना व प्रसाद गावकर यांनी पत्रकारांना सांगितले.
मलप्रभा व कळसा नदीचा प्रवाह उध्वस्त
मलप्रभेच्या उगमस्थानापासून चार किलो मीटरचा प्रवाह पूर्णपणे उध्वस्त करण्यात आला आहे. तर कळसा नदीचाही प्रवाह उगमापासून ३ किमी नष्ट करण्यात आलेला आहे. अनेक ठिकाणी बांध घातला आहे हे दिसून आले आहे. असे डॉ. सावंत म्हणाले.
चोख पोलीस बंदोबस्त
आमदारांच्या दौर्यादरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात पत्रकार आले होते व गोव्याच्या प्रत्येक हालचाली त्यांनी टिपून घेतलेल्या आहेत असे सांगण्यात आले.
अनेकांना रोखले
कणकुंबी परिसराची पाहणी करत असताना कर्नाटकाच्या सुरक्षा रक्षकांनी कामाच्या ठिकाणी जाण्यापासून अनेकांना रोखले. पत्रकारांनाही त्याठिकाणी रोखण्यात आले. फक्त सभापती व आमदार व केरकर यांनाच ठराविक ठिकाणी जाण्यास परवानगी देण्यात आली.
मायकल लोबो यांनी कर्नाटकाचे कारस्थान भयानक असून या प्रश्नी कडक भूमिका घेण्याची गरज असून गोव्याच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होताना पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
माजी सरपंचास पोलीसांनी उचलून नेले
कणकुंबीचे माजी सरपंच अरूण नाईक यांनी कळसा प्रकल्पामुळे कणकुंबी गाव उध्वस्त झालेला असून पाणी गायब झाले आहे. या प्रकल्पाचा आम्हाला कसालाच उपयोग नाही. शेती उध्वस्त झाली आहे अशी माहिती पत्रकारांना देत असताना पोलीसांनी त्यांना उचलून गाडीत घातले.