>> शेतकर्यांचे राज्यपालांना निवेदन
>> बंदमुळे पाच जिल्ह्यांत व्यवहार ठप्प
कर्नाटकातील सुमारे दोनशे शेतकर्यांनी काल मोर्चा काढून म्हादईचे पाणी कर्नाटकाला देण्याची मागणी करणारे निवेदन राज्यपाल, मुख्यमंत्री आणि प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रमुखांना सादर केले. दरम्यान, म्हादई प्रश्नावरून उत्तर कर्नाटकात काल पाळण्यात आलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद लाभला. किरकोळ हिंसक घटना वगळता बंद शांततेत पार पडला. उत्तर कर्नाटकातील पाच जिल्ह्यांतील दैनंदिन व्यवहार बंदमुळे ठप्प होते.
उत्तर कर्नाटकातील दुष्काळग्रस्त भागाला म्हादईचे पाणी गोव्याने देण्याची मागणी करणारे निवेदन कर्नाटकाचे राज्यपाल वजूभाई आर. वाला यांच्या व मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कार्यालयात देण्यात आले आहे असे कर्नाटक शेतकरी असोसिएशन रयत सेनेचे एस. एस. मडीवल्लर यांनी निवेदन दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. बेंगळुरूतील भाजपा मुख्यालयाबाहेर आंदोलन करणार्या शेतकर्यांनी काल जनता दलाचे (एस) नेते माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी भेट घेऊन म्हादई प्रश्न सोडवण्याची मागणी केली. देवेगौडा म्हादईचे पाणी कर्नाटकाला मिळण्यास मदत करणार असे मडीवल्लर यांनी सांगितले.
बंदमुळे दैनंदिन व्यवहार ठप्प
म्हादई प्रश्नावरून पुकारण्यात आलेल्या उत्तर कर्नाटक बंदमुळे काल मलप्रभा नदीच्या खोर्यातील पाच जिल्ह्यात दैनंदिन व्यवहार ठप्प झाले होते. गदग, धारवाड, बेळगावी, हावेरी आणि बागलकोट या जिल्ह्यांतील दुकाने, औद्योगिक आस्थापने, शाळा, कॉलेजेस तसेच बसेच व अन्य वाहतूक बंद होती. म्हादई कळसा – भांडुरा नाला होरता समन्वय समितीने म्हदईच्या पाण्याची मागणी करीत बंदची हाक दिली होती. कन्नड समर्थक संस्था, कन्नड फिल्म सृष्टीने या बंदला पाठिंबा दिला होता.
नवलगुंड येथे दगडफेक
नवलगुंड येथे ट्रकांवर आंदोलकांनी दगडफेक केली. खुल्या असलेल्या दुकानांची शटर्स जबरदस्तीने बंद करण्याच्या घटना घडल्या. रस्त्यावर टायरांची आग पेटवून आंदोलकांनी राग व्यक्त केला. हुबळी येथे चन्नमा सर्कलजवळ आंदोलकांनी मोठा मोर्चा काढून निषेध केला. राज्य तसेच केंद्र सरकारवर आंदोलकांनी यावेळी जोरदार टीका केली. बंद केंद्र व राज्य सरकारासाठी धोक्याची घंटा असल्याचा इशारा संतप्त आंदोलकांनी दिला.
बंगळूर शहरातही म्हादई आंदोलनाचा आवाज घुमला. महिलांचा समावेश असलेल्या उत्तर कर्नाटकातील शेतकर्यांच्या गटाने भाजप कार्यालयाजवळ निदर्शने केली. आंदोलक भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडीयुरप्पा यांनी दिलेल्या आश्वासनानुसार म्हादई प्रश्न सोडवण्याची मागणी करीत होते.
पर्रीकरांचे पत्र राजकीय
दबावामुळे : मंत्री पालयेकर
म्हादई पाणी वाटपाबाबत कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. राज्याच्या हितासाठी प्रसंगी कुठल्याही प्रकारचा त्याग करण्याची तयारी आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भाजपचे कर्नाटकातील नेते बी. एस. येडियुरप्पा यांना दिलेले पत्र राजकीय दबावामुळे असू शकते, असा दावा जलस्रोत मंत्री विनोद पालयेकर यांनी काल केला.
मुख्यमंत्री पर्रीकर यांनी म्हादई नदीतील पाणी पिण्यासाठी देण्यास विरोध नसल्याचे स्पष्ट करून या विषयावर द्विपक्षीय चर्चेची तयारी आहे, अशा आशयाचे पत्र कर्नाटकातील भाजपचे नेते येडियुरप्पा यांना पाठविल्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. जलस्रोत मंत्री विनोद पालयेकर यांनी म्हादईच्या पाणी वाटप प्रश्नावर ठाम असल्याचा दावा पुन्हा एकदा केला आहे. राज्यातील काही भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. आमच्या लोकांना पुरेसे पाणी मिळत नाही. मग, आम्ही दुसर्याला पाणी कसे देऊ शकतो. म्हादई ही आमची जीवनदायिनी आहे. कर्नाटकाला पाण्याचा थेंबसुध्दा दिला जाणार नाही, असेही मंत्री पालयेकर म्हणाले.