मगो पक्ष येत्या ११ रोजी म्हादईप्रश्नी साखळी येथे धरणे धरणार आहे. साखळी येथे ज्या ठिकाणी बंधार्याजवळ म्हादई नदीचा संगम होत असतो त्या ठिकाणी मगो पक्ष धरणे धरणार असल्याची माहिती मगोचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कर्नाटकने यापूर्वीच म्हादईचे २७ टक्के पाणी पळवले असल्याने गोव्यात यंदा पाणी समस्या निर्माण होणार असल्याचे ढवळीकर म्हणाले. कर्नाटकने म्हादईचे पाणी पळवल्याने १५ मेनंतर ओपा प्रकल्पातून पाणीपुरवठा होऊ शकणार नाही, अशी भीती ढवळीकर यांनी व्यक्त केली. मे महिन्यात कमीच पाणीपुरवठा होत असे. आता कर्नाटकने २७ टक्के पाणी पळवले असल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणार असून ओपा पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार असल्याची भीती ढवळीकर यांनी व्यक्त केली. खास करून फोंडा व तिसवाडी या तालुक्यांना पाणी समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
या तालुक्यांना १५ एप्रिलपासून जून महिना उजाडेपर्यंत पाणी समस्येला सामोरे जावे लागेल, असे ते म्हणाले. पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होणार असल्याने वरील काळात ओपाच्या नव्या २७ एमएलडी पाणी शुद्धीकरण प्रकल्पावर परिणाम होण्याची भीती ढवळीकर यांनी यावेळी व्यक्त केली. वरील काळात एरवी सुद्धा बंधार्यातील पाणी ओढून त्याचा पुरवठा करण्यात येत असतो. पण आता बंधार्यांचेही पाणी कमी पडणार असून मुख्यमंत्र्यांना आताच या समस्येत लक्ष घालून काय तोडगा काढणे शक्य आहे ते पहावे लागणार असल्याचे ढवळीकर म्हणाले.