म्हादईप्रश्नी गोव्यातील भाजप सरकार केवळ वेळ वाया घालवत आहे, असा आरोप काल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला. म्हादईची पाहणी करण्यासाठी आपण कर्नाटकच्या सभापतींकडून परवानगी मागू शकत नाही, असे गोव्याचे सभापती रमेश तवडकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यावरून भाजप सरकार म्हादईप्रश्नी गंभीर नसल्याचे व या प्रकरणी केवळ वेळकाळूपणा करत असल्याचे सिद्ध होत आहे, असे आलेमाव यांनी म्हटले आहे.
जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी गेल्या 8 जानेवारी रोजी सभागृह समितीची दुसरी बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी गोव्याच्या सभापतींना कर्नाटकच्या सभापतींना पत्र लिहून म्हादईच्या पाहणीसाठी मंजुरी घेण्याची विनंती करू, असे सांगितले होते, असे आलेमाव यांनी म्हटले आहे.
मात्र, आता सभापती तवडकर यांनी म्हादईची पाहणी करण्यासाठी आपण कर्नाटकच्या सभापतींकडे परवानगी मागू शकत नसल्याचे स्पष्ट केले आहे, याकडे लक्ष वेधले. हे सगळे काय आहे. अशा प्रकारे गोवा सरकार म्हादई नदी प्रकरणी वेळ का वाया घालवत आहे, असा प्रश्न आलेमाव यांनी काल केला. म्हादईवरील सभागृह समितीकडून आपणाला कोणतेही पत्र आले नसल्याचे तवडकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. तसेच म्हादईप्रश्नी आपण हस्तक्षेप करू शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या बाबीकडेही आलेमाव यांनी लक्ष वेधले.
कर्नाटकने म्हादईचे पाणी वळवलेले असतानाही गोवा सरकार आवश्यक ती पावले उचलत नसल्याचा आम्ही जो आरोप केलेला आहे त्याला पुष्टी देणारी अशीच ही घटना असल्याचे आलेमाव यांनी म्हटले आहे.