…म्हणून कॉंग्रेसचे ४४ आमदार बंगळुरूत आश्रयास

0
111

गुजरातमधील राज्यसभेच्या जागांसाठी होणार्‍या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसच्या आमदारांनी राजीनामासत्र सुरू केल्याने तेथील ४४ कॉंग्रेस आमदारांनी आपण आपल्या जीवाला भीती असल्यामुळे कर्नाटकमध्ये आश्रय घेतला असल्याचे काल येथे एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. गेल्या आठवड्यात तातडीने विमानाने बंगळुरुत नेण्यात आलेले हे सर्व कॉंग्रेस आमदार या पत्रकार परिषदेवेळी उपस्थित होते. गुजरातमध्ये राज्यसभेसाठी येत्या ८ ऑगस्टला मतदान होणार आहे.

कर्नाटकात कॉंग्रेसचे सरकार असल्याने तेथे आपल्या आमदारांना सुरक्षा मिळणार असल्याने त्यांना बंगळुरूत आणण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या आमदारांच्या मनात आपले अपहरण होईल किंवा ठार मारले जाईल अशी भीती निर्माण झाली होती असे यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राष्ट्रीय प्रवक्ते शक्तीसिंह गोहिल यानी सांगितले. या संदर्भात बोलताना गोहील यानी भाजपवर गंभीर आरोप केले. राज्यसभा निवडणुकीवेळी क्रॉस व्होटींगसाठी कॉंग्रेसच्या २२ आमदारांना १५ कोटी रुपयांना खरेदी करण्याचा भाजपचा डाव होता असा आरोप त्यांनी केला. आमचे आमदार येथे मौजमजा करण्यासाठी आलेले नाहीत. लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही त्यांना येथे आणले आहे. कारण भाजपने तेथे आमदारांचा घोडाबाजार पैसा व दंडेलशाहीने करण्याचा डाव आखला होता. गुजरात विधानसभेत कॉंग्रेसचे एकूण ५७ आमदार होते. त्यापैकी सहा जणांनी गेल्या तीन दिवसात राजीनामे दिले. त्यापैकी तिघांनी २८ जुलै रोजी भाजपात प्रवेश केला आहे. आमच्या बरोबर सध्या नसलेले ७ कॉंग्रेस आमदारही निवडणुकीत भाजप उमेदवाराला मतदान करणार नाहीत असे गोहिल म्हणाले.