मोहित करणारे सुयश

0
17
  • – धीरज म्हांबरे

अर्जुन तेंडुलकरने प्रथमश्रेणी पदार्पणात शतक झळकावताच समाजमाध्यमांवर त्याचे गोडवे गाणारे पोस्ट, त्याची माहिती सांगणारे लेख झळकू लागले. क्रिकेटमधील ‘अर्जुन’च्या या धामधुमीत सुयश प्रभुदेसाई व मोहित रेडकर या युवा प्रतिभावान खेळाडूंना अपेक्षित ‘कव्हरेज’ देण्यात मात्र राष्ट्रीय प्रसारमाध्यमे कमी पडली हे नाकारता येत नाही.

गोवा संघाने रणजी मोसमाच्या पहिल्याच सामन्यात सुयशचे द्विशतक तसेच मोहित रेडकर व अर्जुन तेंडुलकर यांच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर राजस्थानविरुद्ध पहिल्या डावाच्या आघाडीच्या बळावर ३ मौल्यवान गुणांची कमाई केली. मोसमाची सुरुवात पाचशेपार धावसंख्या रचून झाल्याने गोवा संघ आनंदात आहे. पहिल्या सामन्यात मिळालेली सुरुवात ‘अवे’ सामन्यांतही कायम ठेवण्याची अपेक्षा गोवा संघाकडून आहे.

अर्जुन तेंडुलकरने प्रथमश्रेणी पदार्पणात शतक झळकावताच समाजमाध्यमांवर त्याचे गोडवे गाणारे पोस्ट, त्याची माहिती सांगणारे लेख झळकू लागले. सचिनने कित्येक वर्षांपूर्वी कशी प्रथमश्रेणी पदार्पणात सेंच्युरी ठोकली होती. त्याच्या पुत्राने शतक ठोकतात मुलगा वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत कशी सुरुवात करत आहे, याचीच चर्चा दिसली. सचिनने कसे डिसेंबरमध्येच आपले पहिले प्रथम श्रेणी शतक झळकावले तसेच त्याच्या मुलानेदेखील झळकावले असेदेखील ‘ब्रेकिंग न्यूज’मध्ये झळकू लागले. क्रिकेटमधील ‘अर्जुन’च्या या धामधुमीत सुयश प्रभुदेसाई व मोहित रेडकर या युवा प्रतिभावान खेळाडूंना अपेक्षित ‘कव्हरेज’ देण्यात मात्र राष्ट्रीय प्रसारमाध्यमे कमी पडली हे नाकारता येत नाही.

‘लिट्ल मास्टर’, ‘मास्टर ब्लास्टर’ क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणार्‍या सचिन तेंडुलकरच्या मुलाला प्रसिद्धीची फारशी गरज नाही. ‘तेंडुलकर’ या आडनावासहच तो अपेक्षांचे ओझे घेऊन उतरला आहे. अर्जुन आपल्या बापाच्या जोरावर मुंबई संघाचा मात्र सदस्य होऊ शकला असता. परंतु, तसे झाले नाही. क्रिकेटमध्ये संघात स्थान मिळविण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरील कामगिरी विचारात घेतली जाते. यासाठी बरोबरच्या खेळाडूंना मागे टाकण्यासाठी सातत्य राखावे लागते. शेकडो खेळाडूंमधून १५-२० खेळाडूंना हेरले जाते. यानंतरच अंतिम संघ निवडले जातात. अपेक्षांचे ओझे व प्रचंड स्पर्धेमुळे वेगाने मागे पडण्यापेक्षा अर्जुनने आपली कारकीर्द घडविण्यासाठी ‘गोवा’ या प्रथमश्रेणी क्रिकेटमधील दुबळ्या मानल्या जाणार्‍या संघाची वाट चोखाळली. सिद्धेश लाड व एकनाथ केरकर हे अजून दोन दुर्लक्षित खेळाडू अर्जुनप्रमाणेच गोव्याची वाट धरणार्‍यांपैकी होते. बहुतांशी खेळाडू कारकिर्दीच्या उतारावर केवळ दोन-चार वर्षे कारकीर्द लांबविण्यासाठी नागालँड, मणिपूर, पॉंडिचेरी, गोवासारख्या कमकुवत संघांची वाट चोखाळतात. या तिघांनी मात्र आपली घसरलेली गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी गोव्याला पसंती दिली आहे. सिद्धेशने नुकतीची तिशी ओलांडली असून एकनाथ २९ वर्षांचा तर अर्जुन अवघ्या २३ वर्षांचा आहे. महाभारतातील अर्जुनाने द्रोणाचार्यांकडून जसे ज्ञान प्राप्त केले तसे क्रिकेटमधील अर्जुन हा युवराज सिंग याचे वडील योगराज सिंग यांच्याकडून क्रिकेटचे प्रगत ज्ञान घेत आहे.

वयोगटातील स्पर्धा खेळून प्रत्येक पायरी चढलेला गोव्याचा २२ वर्षीय उदयोन्मुख ऑफस्पिनर मोहित रेडकर याला मुंबईकर खेळाडूंप्रमाणे वलय लाभले नसले तरी ‘सुशेगाद’ गोमंतकीय असूनही त्याने आपल्या प्रथमश्रेणी पदार्पणातच राजस्थानला आपल्या फिरकीच्या जाळ्यात गुरफटून नजरेत भरणारी गोलंदाजी राजस्थानविरुद्ध केली. खेळपट्टीकडून फारशी मदत मिळत नसतानादेखील त्याने दिशा, टप्पा यांच्यात वेळोवेळी केलेला बदल नजरेत भरणारा होता. कमलेश नागरकोटी याचा त्रिफळा उडविणारा त्याचा चेंडू तर जगातील कोणत्याही ऑफस्पिनरला अभिमान वाटावा असाच होता. घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा उठवतानाच त्याने धावा रोखण्याची जबाबदारीदेखील चोख सांभाळली. प्रथमश्रेणी पदार्पणापूर्वी केवळ सात ‘अ’ दर्जांच्या सामन्यांचा अनुभव मोहितच्या गाठीशी होता. सहाव्या, सातव्या क्रमांकावर येऊन फटकेबाजी करणे व गोलंदाजी करून धावा रोखणे एवढेच त्याचे काम होते. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात मात्र तो प्रमुख फिरकीपटूच्या भूमिकेत दिसला. या संधीचे सोने करताना त्याने बळींचे घबाड मिळविले. पहिल्या डावात तळाला येत २८ मौल्यवान धावा काढून त्याने आपल्या विकेटला ‘मोल’ असल्याचे प्रतिस्पर्धी गोलंदाजांना दाखवून दिले. मोठ्या स्तरावरील फारसा अनुभव गाठीशी नसला तरी सुरुवात चांगली झाल्याने या नवोदित फिरकीपटूकडून खूप अपेक्षा आहेत.

आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स संघाकडून खेळणारा २५ वर्षीय सुयश प्रभुदेसाई तर जवळपास प्रत्येक वेळी आपले वेगळेपण दाखवून देतो. सगुण कामत व स्वप्नील अस्नोडकर यांच्या निवृत्तीनंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा तो आपल्यापरीने प्रयत्न करत असतो. राजस्थानविरुद्ध २९ चौकारांसह त्याने केलेली २१२ धावांची मॅरेथॉन खेळी त्याच्या चिकाटीचे व संयमाचे दर्शन देणारी ठरली. अनिकेत चौधरी, कमलेश नागरकोटीसारखे ‘जलदगती’ गोलंदाज प्रत्येक चेंडूवर बळीसाठी प्रयत्न करत असताना त्याने ४१६ चेंडू खेळून किल्ला लढवला. सय्यद मुश्ताक अली, विजय हजारे स्पर्धेत खोर्‍याने धावा करणारा सुयश गोव्यातील क्रिकेटमध्ये सुपरिचित होताच, परंतु आयपीएलमध्ये निवड होताच राष्ट्रीयस्तरावर तो चर्चेत आला. लिलावासाठी अनेक फ्रेंचायझींनी आपले खेळाडू करारमुक्त केलेले असताना आरसीबीने मात्र सुयशवर विश्‍वास दाखवत त्याला राखले आहे. विराटने त्याच्या फलंदाजीवर भरवसा दाखवला आहे.
वेगवेगळी पार्श्‍वभूमी असतानादेखील गोव्याच्या सलामीच्या लढतीत सुयश, मोहित व अर्जुन यांनी आपल्या चिकाटीच्या बळावर कमाल केली. त्यामुळे गोव्याचे पहिल्या सामन्यातील सुयश हे मोहित करणारे ठरले, असेच म्हणावे लागेल.