![CRICKET-T20-INDIA-IPL-PUNJAB-HYDERABAD](https://navprabha.com/wp-content/uploads/2019/04/8Rahul-e1554789304337.jpg)
>> राहुलची नाबाद खेळी
>> मयांकचेही अर्धशतक
>> हैदराबादवर ६ गड्यांनी मात
लोकेश राहुल आणि मयांक अग्रवालच्या शानदा अर्धशतकी खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने मोहालीतील आपला विजयी अश्वमेध चालूच ठेवताना काल अंतिम षट्कापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक लढतीत सनरायझर्स हैदराबादला ६ गड्यांनी पराभूत केले. पंजाबचा हा मोहालीतील सलग सातवा विजय ठरला.
सनराझर्स हैदराबादकडून मिळालेले १५१ धावांचे आव्हान किंग्ज इेलेव्हन पंजाबने २०व्या षट्काच्या पाचव्या चेंडूवर गाठले. लक्ष्याचा पाठलाग करताना किंग्ज इलेव्हन पंजाब १७व्या षट्कापर्यंत १ बाद १३२ अशा सुस्थितीत होता. संदीप शर्माने अर्धशतकवीर मयांक अग्रवालला (३ चौकार व ३ षट्कारांनिशी ५५ धावा) विजय शंकरकरवी बाद केल्यानंतर सामन्यात नाट्यमय वळण आले होते. डेव्हिड मिलर (१) आणि मनदीप सिंग (५) यांना अनुक्रमे संदीप शर्मा आणि सिद्धार्थ कौल यांनी बाद केल्यानंतर सामना अंतिम षट्कापर्यंत लांबला होता. परंतु लोकेश राहुलने अखेर पचाव्या चेंडूवर पंजाबचा विजय साकारला. राहुलने ७ चौकार व १ षट्कारासह ५३ चेंडूत ७१ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. सॅम कुर्रन ५ धावा काढून नाबाद राहिला.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादला ४ गड्यांच्या मोबदल्यात १५० अशी धावसंख्या उभारता आली. सनरायझर्स हैदराबादची सुरुवात अडखळत झाली. अफगाणि फिरकीपटू मुजीब ऊर रहमानने जॉनी बेअरस्ट्रोला (१) बाद करीत हैदराबादला प्रारंभीच जोरदार झटका दिला. कर्णधार अश्विनने त्याचा झेल टिपला. त्यानंतर पंजाबच्या गोलंदाजांनी सूत्रबद्ध व अचूक टप्प्याची गोलंदाजी करीत हैदराबादला मोठे फटके खेळण्यापासून रोखले. हैदराबादने आपले अर्धशतक ११ व्या षटकात धावफलकावर झळकाविले. विजय शंकरला (२४) अश्विरनने त्याला यष्ट्यांमागे राहुलकरवी झेलबाद केले. चौथ्या स्थानी बढती मिळालेला मोहम्मद नबी जास्त काही करू शकला नाही व ७ चेंडूत १२ केल्यानंतर तो चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात अश्विनच्या अचूक फेकीवर धावचित होऊन परतला. मनीष पांडेने १५ चेंडूत १९ धावा जोडल्या. मोहम्मद शामीने त्याला झेलबाद करीत परतीचा रस्ता दाखविला. दीपक हुडाने नाबाद १४ धावा जोडल्या. ७ चौकार व १ षट्कारांसह ६२ चेंडूत संयमी ७० धावांची खेळी केलेला ‘ऑरेंज कॅप’धारक डेव्हिड वॉर्नर नाबाद राहिला. पंजाबतर्फे मुजीब उर रेहमान, मोहम्मद शामी आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद ः डेव्हिड वॉर्नर नाबाद ७०, जॉनी बेअरस्ट्रो झे. रविचंद्रन अश्विन गो. मुजिब उर रेहमान १, विजय शंकर झे. लोकेश राहुल गो. रविचंद्रन अश्विन २६, मोहम्मद नबी धावचित (रविचंद्रन अश्विन) १२, मनीष पांडे झे. राखीव खेळाडू गो. मोहम्मद शामी १९, दीपक हुडा नाबाद १४.
अवांतर ः ८. एकूण २० षट्कांत ४ बाद १५० धावा.
गडी बाद होण्याचा क्रम ः १-७ (जॉनी बेअरस्ट्रो १.४), २-५६ (विजय शंकर १०.४), ३-८० (मोहम्मद नबी १३.२), ४-१३५ (मनीष पांडे १९.१)
गोलंदाजी ः अंकित राजपूत ४/०/२१/०, मुजीब उर रेहमान ४/०/३४/१, मोहम्मद शामी ४/०/३०/१, रविचंद्रन अश्विन ४/०/३०/१, सॅम कुर्रन ४/०/३०/०.किंग्ज इलेव्हन पंजाब ः लोकेश राहुल नाबाद ७१, ख्रिस गेल झे. दीपक हुडा गो. रशिद खान १६, मयांक अग्रवाल झे. विजय शंकर गो. संदीप शर्मा ५५, डेव्हिड मिलर झे. दीपक हुडा गो. संदीप शर्मा १, मनदीप सिंग झे. दीपक हुडा गो. सिद्धार्थ कौल २, सॅम कुर्रन नाबाद ५.
अवांतर ः १. एकूण १९.५ षट्कांत ४ बाद १५१ धावा.
गडी बाद होण्याचा क्रम ः १-१८ (ख्रिस गेल ३.१), २-१३२ (मयांक अग्रवाल १७.१), ३-१३५ (डेव्हिड मिलर १८), ४-१४० (मनदीप सिंग १९)
गोलंदाजी ः भुवनेश्वर कुमार ४/०/२५/०, संदीप शर्मा ४/०/२१/२, रशिद खान ४/०/२०/१, मोहम्मद नबी ३.५/०/४२/०, सिद्धार्थ कौल ४/०/४२/१.