मोलेतील अपघातात तरुण जागीच ठार

0
7

>> नादुरुस्त स्थितीत राष्ट्रीय महामार्गावर उभ्या ट्रकला दुचाकीची धडक; चालक अटकेत

सुकतळी- मोले येथे रस्त्यावर नादुरुस्त झालेल्या मालवाहू ट्रकला सोमवारी रात्री उशिरा दुचाकीची धडक बसून दुचाकीचालक तन्वेश रिवणकर (31, रा. कुळे) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातानंतर संतप्त झालेल्या लोकांनी राष्ट्रीय महामार्ग काहीवेळ रोखून धरला. या प्रकरणी कुळे पोलिसांनी ट्रकचालक मंजुनाथ शिवा बसन्नावर (31, रा. बेळगाव-कर्नाटक) याला अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून नादुरुस्त झालेला केए-22-डी-0481 क्रमांकाचा मालवाहू ट्रक राष्ट्रीय महामार्गावर उभा होता. सोमवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास दुचाकी घेऊन तन्वेश रिवणकर हा मोले येथून फोंडा परिसरात जात होता. त्यावेळी या ट्रकला दुचाकीची धडक बसून तन्वेश रिवणकर याचा जागीच मृत्यू झाला.

अपघातावेळी त्याने हेल्मेट घातले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताचा पंचनामा केल्यानंतर कुळे पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली. संतप्त झालेल्या लोकांनी रस्त्यावर नादुरुस्त झालेल्या ट्रकाची तोडफोड केली. तसेच काहीवेळ राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. त्यामुळे काही वाहने अडकून पडली. कुळे पोलीस स्थानकाचे निरीक्षक सगुण सावंत यांनी लोकांची समजूत काढली. त्यानंतर जमावाला बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्यात आली.