मोरपिर्ला शाळेवर बहिष्कार

0
6

>> इमारत धोकादायक असल्याने पालकांचा निर्णय

मोरपिर्ला येथील शाळा धोकादायक आहे याची माहिती शिक्षण खाते, शिक्षण मंत्री यांना वारंवार दिली होती. मात्र विनवण्या करूनही शाळा सदर शाळेची इमारत दुरूस्त न केल्याने काल शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोरर्पिला येथील पालकांनी मुलांना शाळेवर बहिष्कार घालण्यास लावला. विद्यार्थ्यांसहित पालकांनी इमारतीबाहेर उभे राहून निषेध केला व 10.30 वा. मुलांना घेऊन पालक घरी परतले.

सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. 10 दिवसांमागे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, उपशिक्षणाधिकाऱ्यांनी या शाळेच्या इमारतीला भेट देऊन पाहाणी केली होती. त्यावेळी पालकांनी त्यांना भेटून शाळा 8 दिवसांत दुरूस्त न केल्यास मुलांना शाळेत न पाठविण्याचा इशारा दिला आणि 8 दिवसांत इमारत दुरूस्त करण्याचे अभिवचन देण्यास सांगितले होते. पण शिक्षणाधिकाऱ्यांनी अभिवचन देण्याची असमर्थता व्यक्त केली व काढता पाय घेतला.

काल रविवारी पालकांनी बैठक घेऊन मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय जाहीर केला होता. शाळा अत्यंत धोकादायक स्थितीत असून भिंती कोसळण्याच्या स्थितीत आहेत. पावसाचे पाणी झिरपत असून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. मुख्याध्यापिका खोल्या दुरूस्त केल्याचे, रंगरंगोटी केल्याचे सांगत असल्या तरी फक्त ती वरवरची मलमपट्टी असल्याचे पालकांनी सांगितले. कित्येक वर्षांनी पहिल्यादाच सुरवातीला शाळेच्या खोल्या मुलांविना सुन्यासुन्या बनल्या. शाळा दुरूस्त होईपर्यंत हा बहिष्कार चालू ठेवण्याचा निर्धार पालकांनी व्यक्त केला.