मोरजी खिंड येथे छापा टाकून गुरुवारी तिघांना अटक करण्यात आली व त्यांच्याकडून ३.४५ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
पेडणे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, खिंड-मोरजीजवळ भाड्याच्या घरात राहणारे तिघेजण अमली पदार्थांचा व्यापार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार दळवी यांनी पोलीस फौजफाट्यासह छापा टाकून संशयित शबाब इलियास खान (३९, रा. बेंगळुरू), इम्रान नूर मोहम्मद (३६, रा. ईशान्य दिल्ली) आणि नियाजुद्दीन कमालउद्दीन (२९, रा. बेंगळुरू) यांच्या ताब्यातून विविध प्रकारचे अमली पदार्थ जप्त केले. छाप्यात १.५ लाख रुपये किमतीच्या एक्स्टेसी ३३ गोळ्या, १.९ लाख रुपये किमतीच एमडीएमची १४ पाकिटे आणि गांजा असे सर्व मिळून ३.४५ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले.
अमली पदार्थ सापडल्याने वरील तिन्ही संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.