>> १२ जणांना कळंगुट पोलिसांकडून अटक; ४१ महागडे मोबाईल जप्त
राज्यात नववर्षानिमित्त उत्तर गोव्यातील किनारी भाग आणि सनबर्न संगीत महोत्सवातील गर्दीचा गैरफायदा घेऊन चोर्या करण्यासाठी आलेल्या एका आंतरराज्य टोळीतील १२ जणांना अटक करत कळंगुट पोलिसांनी मोबाईल फोन चोरीचे मोठे कट कारस्थान उधळून लावले. पोलिसांनी संशयितांकडून ४१ महागडे मोबाईल फोन आणि ८ ग्रॅम अमलीपदार्थ जप्त केला. त्यांच्याकडून हस्तगत केलेल्या मोबाईल फोनची किंमत अंदाजे ३० लाख रुपये एवढी आहे. या टोळीतील इतरांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. तसेच अमलीपदार्थ प्रकरणी देखील चौकशी केली जात आहे, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी पोलीस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत येथे काल दिली.
राज्यात नववर्ष, सनबर्न संगीत महोत्सव आणि विविध कार्यक्रमांची रेलचेल असल्याने पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे. २८ डिसेंबर रोजी पुणे येथील जितेश मेहता यांनी आपल्या खिशातील मोबाईल चोरीस गेल्याची तक्रार कळंगुट पोलीस स्थानकावर नोंद केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर संशयितांची माहिती प्राप्त झाली. त्यानंतर त्यांना शोधण्याची मोहीम सुरू करण्यात आली. त्याचा शोध घेत असताना बागा येथील दोन हॉटेलमध्ये चोरट्यांच्या २ टोळ्या एका हॉटेलमध्ये राहत असल्याचे तपासात आढळून आले. पोलिसांनी दोन टोळ्यांतील १२ जणांना ताब्यात घेण्यात यश मिळविले. त्यांच्याकडून ४१ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले. तसेच तक्रारदार जितेश मेहता यांचा चोरीस गेलेला मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश प्राप्त केले.
संशयितांकडील दोन इनोव्हा कारगाड्या देखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत. संशयित मूळ महाराष्ट्रातील असून, सध्या ते देशातील विविध भागात राहत होते, असे निधीन वाल्सन यांनी सांगितले.
या प्रकरणी चौकशीमध्ये संशयितांनी सनबर्न संगीत महोत्सवाची तिकिटे ऑनलाइन पद्धतीने खरेदी केल्याचे आढळून आले. सनबर्न आणि किनारी भागातील पर्यटकांच्या गर्दीचा गैरफायदा घेऊन मोबाईल फोनची चोरी करण्याचे टोळक्याने ठरविले होते, असेही वाल्सन यांनी सांगितले.
ही कारवाई कळंगुटचे पोलीस निरीक्षक दत्तगुरू सावंत यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक राजाराम बागकर, प्रगती मळीक, हवालदार विद्यानंद आमोणकर, विशाल गावस, पोलीस शिपाई विजय नाईक, अमीर गरड, गणपत तिळोजी, महेंद्र च्यारी, संज्योत केरकर, रुपेश साळगावकर, स्मितल बांदेकर, अक्षय कामुर्लीकर, प्रितेश किनळेकर, भगवान पालयेकर, आकाश नाईक, लक्ष्मण पटेकर, मनोज शिंदे, सर्वेश तुयेकर यांनी केली.