राज्यातील जनतेला मोफत पाणी देण्याची जी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे, त्यावर काल प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी, अशा घोषणा करण्यात भाजपवाले हे पटाईत आहेत. ते घोषणा खूप करतात, पण अंमलबजावणी मात्र एकाचीही करीत नाहीत. फुकट पाणी देण्याची योजना ही चांगली आहे. या योजनेची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नुसतीच घोषणा आहे का तेही पहावे लागेल असे सांगितले.
आपले सरकार सत्तेवर आल्यानंतर पेट्रोलचे दर लिटरमागे ६० रुपयांवर जाऊ देणार नसल्याची घोषणा भाजप सरकारने केली होती. आज पेट्रोलचे दर लिटरमागे १०० रुपयांवर गेले असल्याचे कामत म्हणाले. मुख्यमंत्री सावंत यांनी गेल्या अर्थसंकल्पातूनही विविध घोषणा केल्या होत्या, असे सांगून त्यातील कितींची अंमलबजावणी केली याचा जनतेपुढे अहवाल ठेवणार असल्याचे कामत यांनी सांगितले.
आपकडून स्वागत
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी राज्यातील जनतेला मोफत पाणीपुरवठा करण्याचे जे आश्वासन दिले आहे, त्याचे आम आदमी पक्ष स्वागत करीत असल्याची प्रतिक्रिया काल पक्षाचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे यांनी काल दै. नवप्रभाशी बोलताना दिली. खरे म्हणजे यापूर्वीच राज्यातील जनतेला मोफत पाणीपुरवठा द्यायला हवा होता. पण तो भाजपने कधी केला नाही. आम्ही गोव्यातील जनतेला गोव्यात सत्तेवर आल्यावर मोफत वीजपुरवठा करण्याची जी घोषणा केली, तेव्हा वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी जनतेला काहीही फुकट देणे शक्य नसल्याचे म्हटले होते. मात्र आता मुख्यमंत्र्यांनी मोफत पाणापुरवठा करण्याचे जे आश्वासन दिले आहे, त्याचे आम्ही स्वागत करतो, असे म्हांबरे म्हणाले.