2022 सालच्या गोवा विधानसभा निवडणुकीवेळी आपल्या जाहीरनाम्यात भाजपने आपले सरकार सत्तेवर आल्यास राज्यातील जनतेला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याची जी घोषणा केली होती, त्या घोषणेचे काय झाले, असा सवाल गोवा फॉरवर्ड पक्षाच्या उपाध्यक्ष ॲड. अश्मा सय्यद यांनी केला. तसेच ही योजना सुरू करण्यापूर्वीच ती गुंडाळून भाजप सरकारने गोव्यातील महिलांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोपही त्यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. भाजप सरकारने ही योजना गुंडाळल्याचे सिद्ध करणारी कागदपत्रे गोवा फॉरवर्डकडे असल्याचे त्या म्हणाल्या. 8 फेब्रुवारी 2022 रोजी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता, त्यात प्रत्येक कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याचे आश्वासन दिले होते. अनेक महिने उलटूनही याबाबत काहीच निर्णय झाला असल्याचे गोवा फॉरवर्डने माहिती हक्क कायद्याखाली मिळवलेल्या माहितीतून उघड झाले आहे. त्यामुळे सरकारने आता ही योजना लागू करणार आहे की नाही हे स्पष्ट करावे, अशी मागणी सय्यद यांनी केली.