मोप विमानतळ उभारण्यासाठी प्रस्ताव स्वीकारण्याचा निर्णय

0
78

मोप आंतरराष्ट्रीय ग्रीनफिल्ड पध्दतीचा विमानतळ उभारण्यासाठी जागतिक पातळीवर पात्रतेसाठीचे विनंती प्रस्ताव स्वीकारण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. किमान सहा कंपन्यांची यादी तयार केली जाईल. त्यासाठी ३ रोजी जाहिरात प्रसिध्द करणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. दाबोळी विमानतळही चालू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रीनफिल्ड पध्दतीचे विमानतळ उभारण्याचा अनुभव असलेल्या कंपन्यांकडून प्रस्ताव स्वीकारले जातील. पर्यावरणीय परिणाम शक्यशक्यतेचा अभ्यास पूर्ण केल्यानंतरच प्रकल्पासाठीचे कंत्राट दिले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
विमानतळाच्या प्रश्‍नावर बैठकीत सुमारे एक तास चर्चा झाली. पर्यावरणीय अभ्यास पूर्ण करण्यापूर्वीच पात्रतेसाठीची यादी तयार का करावी, या मुद्यावर वनमंत्री एलिना साल्ढाणा यांनी तसेच नावेलीचे आमदार आवेर्तना फुर्तादो यांनी हरकत घेतल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.
त्यामुळे लवकरच मोप प्रकल्पाची संपूर्ण माहिती देण्यासाठी मडगाव येथील रवींद्र भवनात व कुठ्ठाळी मतदारसंघात कार्यक्रम आयोजित करून तेथील लोकांच्या शंकांचे निरसन करण्याचे ठरविले आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. फुर्तादो व साल्ढाणा यांच्या मतदारसंघातील लोकांच्या मनातील भीती व संशय दूर करण्यासाठीच कार्यक्रम करण्याचे ठरविले असून हवाई उड्डाण मंत्रालयाचे अधिकारीही त्याचेळी उपस्थित राहतील, असे पर्रीकर यांनी सांगितले.
आणखी ३ लाख चौ. मी. जागेचे लवकरच संपादन
विमानतळासाठीच्या जोड रस्त्यांसाठी अतिरिक्त ३,११५७८ चौ. मी. जमीन ताब्यात घेण्याची गरज असून त्यासंबंधीची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, अशी माहिती पर्रीकर यांनी दिली. पात्रता प्रस्तावाची यादी तयार केल्यानंतर आरएफपी संबंधीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
३९१ एकरात व्यापारी विकास
या प्रकल्पासाठी एकूण ८२ लाख चौ. मीटर जमीन ताब्यात घेतली असून प्रकल्प बाहेररील सुमारे ३९१ एकर जमीन व्यापारी विकासासाठी निश्‍चित करण्याचे सरकारने ठरविले आहे. भारत सरकारच्या इंजिनीयर्स इंडिया लिमिटेड कंपनी या प्रकल्पाचा पर्यावरणीय दृष्टीकोनातील अभ्यास करीत आहे.