मोप विमानतळाच्या उद्घाटनाची घाई कशाला?

0
24

>> आमदार विजय सरदेसाई यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मोप येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सदर विमानतळाचे उद्घाटन करण्याची एवढी घाई का झाली आहे, असा सवाल काल गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी केला.

या विमानतळाचे बांधकाम अद्याप चालू असून, हे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच विमानतळ सुरू करायला हवा; पण मुख्यमंत्र्यांना या विमानतळाचे उद्घाटन करण्याची नको तेवढी घाई झाली आहे. ही घाई धोक्याची ठरू शकते, असा इशाराही सरदेसाई यांनी दिला.
विमातळावरील साधनसुविधा तयार करण्याबाबत खरे म्हणजे सरकारने जलदगतीने पावले उचलायला हवीत; पण त्याऐवजी विमानतळाच्या उद्घाटनासाठी घाई केली जात असल्याचे सरदेसाई म्हणाले. भ्रष्टाचार व निष्क्रियता लपवण्यासाठी ही घाई केली जात असल्याचा आरोपही सरदेसाई यांनी केला.

झुआरी पुलावरील नव्या केबल स्टेड पुलाच्या साधनसुविधेचे लेखापरीक्षण (आर्थिक व्यवहार तपासणी) व्हायला हवे, अशी मागणीही सरदेसाई यांनी केली. गुजरातमधील मोरबी येथील पूल कोसळण्याची घटना घडल्याच्या पार्श्‍वभूमीवर या पुलाच्या लेखापरीक्षणाची गरज निर्माण झाली असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.