>> उत्तर गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांची माहिती
मोप विमानतळ लिंक रोडचे काम कायदेशीर असून, या रस्त्यासाठीची सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच हे काम हाती घेण्यात आले असल्याची माहिती उत्तर गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी काल दिली. तसेच नागझर पंचायत नोटीस जारी करून हे काम बंद पाडू शकत नाही, असा खुलासाही रॉय यांनी केला.
मोप विमानतळ लिंक रोडसाठी ज्या शेतकर्यांच्या जमिनीतील झाडे कापून रस्ता तयार केला जात आहे, ते शेतकरी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहे; मात्र अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.
काल मोप लिंड रोड पीडित शेतकर्यांच्या एका शिष्टमंडळाने उत्तर गोवा जिल्हाधिकार्यांची भेट घेतली; मात्र आपले म्हणणे ऐकून न घेताच आपणाला माघारी पाठवल्याने चिडलेल्या शिष्टमंडळातील शेतकर्यांनी या प्रश्नी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मोप लिंक रोडचे काम बंद ठेवावे, अशी नोटीस नागझर पंचायतीने सरकारला दिली होती, त्या नोटिसीला २ मार्चपर्यंत उत्तर देण्यात येणार असल्याचे उत्तर गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी स्पष्ट केले होते; मात्र जिल्हाधिकार्यांकडून उत्तर मिळालेले नाही. त्यांच्याकडून येणार्या उत्तराचा अभ्यास करून पुढील कृती ठरवली जाईल, असे सरपंच संजय तुळस्कर यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, नागझर पंचायतीने रस्त्याचे काम बंद करण्याबाबत जी नोटीस पाठवली आहे, तिला लवकरच उत्तर देण्यात येणार असल्याचे रॉय यांनी स्पष्ट केले आहे.