मोपमुळे पर्यटन, आर्थिक विकासाला चालना

0
21

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

>> विमानतळाला मनोहर पर्रीकरांचे नाव

>> मोप विमानतळाचे शानदार उद्घाटन

>> दोन्ही विमानतळ सुरू ठेवण्याची ग्वाही

मोप विमानतळामुळे कनेक्टिव्हिटी सुधारणा होणार असून पर्यटन आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. मोप विमानतळामुळे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्याही मोठ्या संधी निर्माण होतील. मालवाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोप येथे काल न्यू गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केल्यानंतर बोलताना काल केले. या उद्घाटन सोहळ्याला राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांची उपस्थिती होती.

गोवेकरांनी दिलेले प्रेम
विकासाच्या रूपाने देणार

गोव्यातील नागरिकांकडून मला जे प्रेम आणि आशीर्वाद आहे. ते मी विकासाच्या रूपात व्याजासह परत करणार आहे. मोप आंतरराष्ट्रीय विमानतळ हे प्रेम परत करण्याचा एक प्रयत्न आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

८ वर्षांत ७२ विमानतळ
देशात नवीन साधनसुविधा निर्मितीसाठी गुंतवणूक केली नाही. परिणामी मध्यमवर्गीय विमान प्रवासाच्या क्षमतेचा वापर होऊ शकला नाही. मध्यमवर्गीयांनासुद्धा विमानातून प्रवास करण्याची इच्छा आहे. त्यामुळे डबल इंजिनाच्या सरकारने विमानतळामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. मागील आठ वर्षात नवीन ७२ विमानतळ उभारण्यात आले आहेत, केंद्र सरकारने विमान व इतर क्षेत्रात वाहतूक सुविधा वाढविण्यावर भर दिला असल्याची माहिती यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दिली.

कोकण रेल्वेचे विद्युतीकरण, नवीन रस्ते यांचा गोव्याच्या पर्यटन विकासासाठी चांगलाच लाभ होणार आहे. देशात विदेशी पर्यटकांची संख्या वाढविण्यावर विविध योजनांच्या माध्यमातून दिला जात आहे. असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

गोवा राज्यासाठी दाबोळी हा विमानतळ अपुरा पडत होता. याठिकाणी माल वाहतूक, पार्किंगची योग्य सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात गोव्यात नवीन विमानतळासाठी नियोजन करण्यात आले होते. तथापि, वाजपेयी यांचे सरकार कोसळल्यानंतर सत्तेवर आलेल्या सरकारने गोव्यातील विमानतळाच्या नियोजनाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे विमानतळाचा प्रकल्प रखडला.

वर्ष २०१४ मध्ये केंद्रात डबल इंजीन सरकार स्थापन झाल्यानंतर विमानतळाच्या विषयाला पुन्हा चालना देण्यात आली. विमानतळाच्या कामात अनेक अडचणी आल्या. त्या अडचणीवर मात करून अखेर आता विमानतळाचे लोकार्पण केले जात आहे. या नवीन विमानतळामुळे प्रवासी हाताळण्याची संख्या वाढणार आहे. तसेच उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांना माल वाहतूक करायला मिळणार आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. गोव्यातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी आणि हॅरिटेज पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. राज्य सरकार सामाजिक सुरक्षेवर समर्पितपणे काम करीत आहे. स्वयंपूर्ण गोवा हा उपक्रम कौतुकास्पद आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

दोन्ही विमानतळ कार्यरत ः शिंदे
गोव्यातील मोप आणि दाबोळी हे दोन्ही विमानतळ कार्यरत राहणार आहेत. मोप विमानतळाच्या बांधकामासाठी २८७० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत, असे नागरी विमान वाहतूकमंत्री शिंदे यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली विमान वाहतूक क्षेत्रावर भर देण्यात आला आहे. देशभर विमानतळ उभारण्याचे काम सुरू असून देशातील विमानतळाची संख्या २२० वर जाणार आहे. विमानसेवेच्या माध्यमातून गोव्याला म्हैसूर येथे जोडण्यात आले असून आता नाशिक येथे जोडण्यात येणार आहे, असेही केंद्रीयमंत्री शिंदे यांनी सांगितले.

मोप विमानतळाची पायाभरणी स्व. मनोहर पर्रीकर यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात करण्यात आली. स्व. पर्रीकर यांनी गोव्यात विकासाची गंगा आणली. त्यांचेच नाव नवीन विमानतळाला द्यावे, असे भावुक उद्गार मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी याप्रसंगी बोलताना काढले.

विमानतळावर विविध सुविधा
सुमारे २,८७० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा विमानतळ शाश्वत पायाभूत सुविधांच्या मध्यवर्ती संकल्पनेवर बांधण्यात आला आहे. या विमानतळाच्या उभारणी कामात, ५ जी तंत्रज्ञानाशी अनुरूप माहिती तंत्रज्ञानाच्या पायाभूत अशा सर्वोत्तम दर्जाच्या विशेष तंत्रज्ञानांचा वापर करण्यात आला आहे. विमानतळाच्या इतर वैशिष्ट्यांमध्ये, रात्रीच्या वेळी विमाने उभी करून ठेवण्यासाठी विशेष व्यवस्थेसह १४ पार्किंग बेज, सेल्फ-बॅगेज ड्रॉप सुविधा, अत्याधुनिक, स्वायत्त हवाई दिशादर्शन सुविधा अशा अनेक सोयींचा समावेश आहे.

‘मनोहर’ नामकरण

या मोप विमानतळाचे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्यात येत आहे, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी याप्रसंगी केली. मोप आंतरराष्ट्रीय विमानतळाला माझे मित्र आणि सहकारी, गोव्याचे लाडके नेते मनोहर पर्रीकर यांचे नाव दिले जात आहे. विमानतळाच्या माध्यमातून त्यांच्या स्मृती कायम राहतील, असेही पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले आहे. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे केंद्रातील सरकारच्या बदललेल्या विचारसरणीचे उदाहरण आहे. देशात २०१४ पूर्वीच्या सरकारने अशा प्रकारचा विचार केला नव्हता. त्यांनी केवळ आपली व्होट बँक कायम राखण्यासाठी प्राधान्य दिले असल्याची टीका यावेळी मोदी यांनी केली.

मोपमुळे नोकर्‍यांची निर्मिती होणार ः सावंत

मोप विमानतळामुळे आगामी पाच वर्षांत आणखी तीन ते चार हजार नोकर्‍यांची निर्मिती होणार आहे, मोप विमानतळाच्या कामात अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागले. सर्व अडीअडचणींवर मात करून विमानतळ जनतेसाठी खुला करण्यात येत आहे. राज्यातील दाबोळी आणि मोप हे दोन्ही विमानतळ कार्यरत राहणार आहेत. मोप विमानतळावरील विमानांची संख्या जास्त असेल. मोप विमानतळाला जोडणारा बगल रस्ता येत्या ऑगस्ट २०२३ पर्यंत पूर्ण केला जाणार आहे. मोप विमानतळासाठी झाडांची कत्तल केली जात असल्याची पर्यावरणप्रेमींकडून टीका करण्यात येत आहे. मात्र सुमारे साडेसहा लाख झाडे लावण्यात आली आहेत. तसेच जीएमआर कंपनीने ५० हजार झाडांची लागवड केली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

लोकसेवेवर भर द्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनानंतर भाजपचे मंत्री, आमदार आणि गाभा समितीच्या पदाधिकार्‍यासोबत बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांनी बैठकीत सर्वांना लोकसेवेवर भर देण्याचा सल्ला दिला, अशी माहिती सूत्रांनी दिली.