‘मोप’च्या दरपत्रकासाठीचा प्रस्ताव ३ ऑक्टोबरला जाहीर करणार

0
115

एप्रिलपर्यंत प्रत्यक्ष कामाच्या निविदा : मुख्यमंत्री
अनेक वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय मोप विमानतळाला चालना मिळाली असून येत्या दि. ३ ऑक्टोबर रोजी मोप विमानतळासाठी (पीएफक्यू) कोटेशनसाठीचा प्रस्ताव जाहीर करणार असून त्यानंतर एप्रिलपर्यंत प्रत्यक्ष कामासाठीची निविदा जाहीर करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकारांना दिली. मोप विमानतळाला असलेला विरोध थंडावला असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
गेल्या पंधरा दिवसांच्या काळात या प्रकल्पावर चर्चा करण्यासाठी दोन बैठका झाल्या. पुढील मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोटेशन मागविण्यासाठीच्या प्रस्तावास मान्यता मिळविली जाईल, असे पर्रीकर यांनी सांगितले. जानेवारी दरम्यान आरएफपी जाहीर केला जाईल. गेल्या अनेक वर्षांपासून मोप विमानतळाचा विषय गाजत आहे. विधानसभा लोकसभा निवडणुकीतही राज्यातील कॉंग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी या विषयाचा वापर केला होता. दक्षिण गोव्यातील काही लोकांचा या प्रकल्पाला विरोध होता. त्यामुळे काही राजकारण्यांनी निवडणुकीच्यावेळी सावध भूमिका घेतली होती. भाजपने मोप विमानतळाचे नेहमीच समर्थन केले होते. दाबोळी विमानतळावर प्रवाशांची गर्दी वाढत आहे. भविष्यकाळात गोव्याला नव्या विमानतळाची गरज आहे. या पार्श्‍वभूमीवरच मोप विमानतळाचा प्रस्ताव पुढे आला होता. राज्यात मोप विमानतळ उभारण्यात आला तरी दाबोळी विमानतळ चालूच ठेवण्याचा सरकारचा निर्णय आहे. त्यामुळे मोपचा विरोध आता थंडावला आहे. नवा विमानतळ खाजगी तत्त्वावर उभारण्यात येणार असल्याने निविदा जाहीर केल्या नंतरच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून प्रतिसाद कसा मिळतो त्यावर या प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे.