आपल्या सरकारविरुध्दचा अविश्वास ठराव म्हणजे विरोधकांच्या उर्मटपणाचा परिपाक असून अन्य सर्व पक्षांनी हा ठराव फेटाळून लावावा असे आवाहन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसची केवळ ‘मोदी हटाव’ ही एकसूत्री मनोवृत्ती आहे अशी टीका काल रात्री लोकसभेत अविश्वास ठरावावरील चर्चेस उत्तर देताना केली. शेवटी मतदानाद्वारे हा ठराव एनडीए सरकारने ३२५ वि. १२६ अशा फरकाने जिंकला.
त्याआधी पंतप्रधान मोदी यांनी आपले सरकार आंध्र प्रदेश व तेलंगणच्या विकासासाठी वचनबध्द असल्याचे स्पष्ट केले. एनडीएच्या बाजूने भक्कम संख्याबळ असल्याने विरोधकांचा डाव यशस्वी होणार नाही हे अपेक्षित होते. राहुल गांधी यांच्या टीकेचा समाचार घेत असताना काही लोक नकारात्मक राजकारण करीत आहेत अशी टीका त्यांनी केली. आपल्याला राहुल गांधींनी आलिंगन दिले त्या कृतीवरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ‘एका व्यक्तीला माझ्या आसनावर बसायचे आहे. पण त्यासाठी एवढी घाई कशाला?’ असा टोला त्यांनी हाणला.
राहुल गांधींच्या कृतीला सभापतींची हरकत
पंतप्रधानांचे देशाचा आपण चौकीदार असल्याचे विधान, त्यांच्याकडून झालेला राफेल जेट विमान खरेदी व्यवहार यासह अन्य विविध विषयांवरून मार्मिक व घणाघाती टीका करून झाल्यानंतर राहुल गांधींनी भाषण संपवून सभागृहात बसलेल्या पंतप्रधान मोदींना आलिंगन दिले. त्यानंतर चेहर्यांवर मिश्किल हास्य आणि डोळे मिचकावणे यासारखी कृतीही त्यांनी केली. राहुलनी मिठी मारल्यानंतर पंतप्रधानांनी त्यांच्या पाठीवर थाप मारली. तर सोनिया गांधींसह सर्व कॉंग्रेस नेत्यांनी त्यांना दाद दिली. मात्र सभापती सुमित्रा महाजन यांनी त्यांच्या कृतीला हरकत घेतली. त्या म्हणाल्या, ‘राहुल माझे शत्रू नाहीत. ते माझ्या मुलाप्रमाणे आहेत. मात्र पंतप्रधानांना मिठी मारल्यानंतर डोळे मिचकावण्याची कृती अयोग्य होती. सर्वांनी सभागृहाची शान राखावी’.