चेन्नईजवळील पुरातन किनारी गाव असलेल्या महाबलीपूरमला सध्या प्रचंड कडेकोट सुरक्षा बंदोबस्तामुळे एखाद्या युद्धग्रस्त किल्ल्याचे स्वरुप आले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे अध्यक्ष शी जीनपिंग यांच्यात अनौपचारीक बैठकीचे येथे आयोजन करण्यात आले असल्याने या गावात तामिळनाडूच्या विविध भागांमधील सुमारे ५ हजारहून जास्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच या गावाला साज शृंगार चढविण्यात आला आहे.
मोदी-जिनपिंग यांची आज भेट होणार्या परिसरात ८०० सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. किनार्यानजीकच्या शोरे मंदिराला उभय नेते भेट देणार असल्याने तेथील किनार्याजवळ तटरक्षक दलाचे जहाज टेहळणीसाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. मंदिरानजीक अनेक अडथळे उभारण्यात आले आहेत. येथील मच्छिमारांना आज समुद्रावर न जाण्याचे आदेश देण्यात आले आहे. परिसरात दोन डझन संख्येचे श्वान पथकही तैनात केले आहे.
परिसरातील प्राचीन स्मारके यांचे सुशोभिकरण मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. सर्व परिसर अत्यंत स्वच्छ करण्यात आला आहे.
या किनारी गावात सुमारे १०० शोभेचे आकर्षक दिवे बसविण्यात आले आहेत. तसेच गावाच्या सीमेवर भव्य स्वागत प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. या ठिकाणी मोदी – जीनपिंग यांच्या बॅनर व्यतिरिक्त त्यांचे भव्य कट-आऊटस्ही उभारले आहेत. संपूर्ण परिसरातील जागतिक वारसा स्मारकांचे संबंधित खात्याकडून विशिष्ट पद्धतीने साफसफाई करण्यात आली आहे.