गोवा 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज झाला असून उद्या 26 ऑक्टोबर रोजी फातोर्डा येथील पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर या स्पर्धेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याला केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर उपस्थित राहतील, तर अरुणाचल प्रदेश, आसाम आणि ओडिशा या राज्यांच्या क्रीडा मंत्र्यांनी उपस्थिती निश्चित केली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पर्वरी येथे सांगितले. क्रीडा स्पर्धेच्या अधिकृत उद्घाटन सोहळ्यापूर्वी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्यासमवेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सुमारे 7000 प्रेक्षक, 5000 विद्यार्थी आणि 2000 खेळाडू या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधानांसमोर प्रत्येक राज्यातील विद्यार्थ्यांचे संचलन होणार आहे. पंतप्रधानांच्या भाषणानंतर 600 कलाकार राष्ट्रीय एकात्मतेवर बहारदार कार्यक्रम सादर करतील. सुखविंदर सिंग आणि हेमा सरदेसाई देखील सादरीकरण करणार आहेत. विशेष आकर्षण म्हणून ड्रोन शोही होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी क्रीडा क्षेत्राशी संबंधित पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी केलेल्या दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे खेळाडूंना मदत होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. आम्ही क्रीडा पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक करत आहोत. क्रीडा परिसंस्था विकसित केली जात आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांचा चांगला उपयोग होईल. अशा प्रकारच्या बहुक्रीडा प्रकारांचा समावेश असलेल्या स्पर्धेच्या आयोजनामुळे विविध खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार आहे. भविष्यातील अशा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी मुलांना प्रेरणा मिळणार आहे. आपल्या पाल्यांना स्पर्धा पाहण्यासाठी स्पर्धा स्थळी घेऊन जाण्याचे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.
प्रत्येक केंद्रावर निवास,
भोजन व वाहतूक व्यवस्था
निवास, भोजन आणि वाहतूक व्यवस्थेविषयीची पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली असून ती स्पर्धेसाठी येणाऱ्या सर्व खेळाडूंना देण्यात येईल. मोले, पोळे, केरी, पत्रादेवी अशा प्रत्येक ठिकाणी आणि चेकपोस्टवर खेळाडूंच्या स्वागतासाठी स्वयंसेवक ठेवण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
या स्पर्धेत पणजी, कांपाल, मडगाव, म्हापसा, वास्को आणि फोंडा अशा सहा ठिकाणी विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या सर्व ठिकाणी निवास, आहार आणि वाहतुकीसाठी स्वतंत्र प्रमुख नेमण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी प्रत्येक विभागाचे नेतृत्व पोलीस अधीक्षक करीत आहेत. जीसीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळांवर इन्सिडेंट कमांडर तैनात असून सुविधांवर लक्ष ठेवून आहेत.
अद्ययावत आरोग्य सुविधा
आरोग्य सुविधांबाबत सावंत म्हणाले की, प्रत्येक ठिकाणी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा रुग्णालयाद्वारे सुविधा पुरविल्या जातील. एखादा खेळाडू जखमी झाल्यास बांबोळी येथील ‘गोमेकॉ’मध्ये शल्यचिकित्सक 24 तास उपलब्ध असतील. खेळाडू जखमी झाल्यास अतिदक्षता विभागात खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. जीएमसीचे विशेष पथकही 24 तास तैनात ठेवण्यात आले आहे. कार्यक्रम स्थळाजवळील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये वरील सुविधा उपलब्ध असतील. खेळाडू जखमी झाल्यास संबंधित ठिकाणाहून रुग्णालयात कमीत कमी वेळेत नेण्यासाठी सुविधा आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
उद्घाटनाला पासधारकांनाच प्रवेश
मुख्यमंत्री म्हणाले की, उद्घाटन समारंभासाठी फातोर्डा स्टेडियम सर्वसामान्य जनतेसाठी खुले केले जाणार नाही. निमंत्रितांसाठीच हा समारंभा खुला असेल. निमंत्रितांचा प्रवेशही विनामूल्य आहे. परंतु, केवळ पासधारकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. पासधारकांनी सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत फातोर्डा येथे आपापल्या जागेवर उपस्थित राहावे, असे आवाहन सावंत यांनी केले. मंत्री, आमदार, जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच आदींकडून लोक हे पास मिळवू शकतात. पास मिळविण्यासाठी क्रीडा संचालनालयाच्या कार्यालयाशी देखील संपर्क साधता येईल. क्रीडाप्रेमींनी हा सोहळा चुकवू नये. विद्यार्थ्यांसाठी मर्यादित स्वरूपात बससेवा देखील ठेवण्यात आली आहे. लोकांना उद्घाटन स्थळी आणण्याची व्यवस्था आमदारदेखील करतील. उद्घाटन समारंभ आणि खेळांचे सार्वजनिक स्क्रीनिंग केले जाईल. अशा ठिकाणांची यादी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केली जाईल. तसेच 28 तारखेपासून क्रीडानगरीच्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पंतप्रधानांच्या आगमनामुळे
वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल
फातोर्डा येथील नेहरू स्टेडियममध्ये गुरुवार दि. 26 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन होणार असून, ह्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हजर राहणार असल्याने सदर दिवशी राज्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल केले जाणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी काल स्पष्ट केले. गुरुवारी दुपारी 2.30 ते रात्री 8.30 वाजेपर्यंत आयएनएस हंसा ते बिर्ला क्रॉस ते वेर्णा टायटन ते सुरावली जंक्शन (पश्चिम बगल मार्ग) ते मडगाव येथील जुना बाजार सर्कल हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. नरेंद्र मोदी यांना नेहरू स्टेडियमवर जायचे असल्याने ही सोय करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांना पणजीतून दाबोळी विमानतळावर जायचे असेल, त्यांना आगशी ते जुना झुआरी पूल ते कुठ्ठाळी जंक्शन ते विमानतळ असा प्रवास करावा लागेल. तसेच मडगाव येथून पणजीला येणाऱ्यांना आर्लेम सर्कल, राया बोरी टोलनाका, रासई ते ठाणे कुठ्ठाळी व नवा झुआरी पूल असा प्रवास करावा लागेल. वास्कोहून पणजीला प्रवास करणाऱ्यांना चिखली जंक्शन ते सेंट जासिंतो बेट ते कुठ्ठाळी ते नवा झुआरी पूल असा प्रवास करावा लागेल, असे वाहतूक पोलिसांनी कळवले आहे.