मोदींमुळे लुईस गोमीस यांचे अखंड भारताचे स्वप्न साकार

0
16

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे नावेली येथे उद्गार डॉ. फ्रांसिस्क लुईस गोमीस यांच्या पुतळ्याचे अनावरण

पोर्तुगालच्या संसदेत अखंड भारताच्या स्वातंत्र्याचे स्वप्न जगासमोर धडाडीने व बुद्धीकौशल्याने मांडणारे थोर महामानव डॉ. फ्रांसिस्क लुईस गोमीस होते. तेच अखंड भारताचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साकार केले आहे. यापुढे त्यांची जयंती व पुण्यतिथी शासकीय पातळीवर या पुतळ्यासमोर साजरी करण्यात येईल. त्या दिवशी जिल्हा प्रशासनतर्फे नावेली व परिसरातील विद्यार्थ्यांना येथे आणून त्यांना आदरांजली वाहिली जाईल असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल जाहीर केले.

नावेली येथील अस्मिताय भूमीत डॉ. फ्रांसिस्क लुईस गोमीस यांचा पुतळा उभारला आहे. त्याचे अनावरण काल मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी कायदेमंत्री आलेक्स सिक्वेरा, आमदार उल्हास तुयेकर, गोमीश ट्रस्टचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो, स्वातंत्र्यसैनिक फा. गाब्रियल कुतिन्हो, जिल्हा पंचायत सदस्य ॲडविन कार्दोज आदी उपस्थित होते.

गोव्याचे थोर स्वातंत्र्यसेनानी डॉ. फ्रांसिस्क लुईस गोमीस यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य आपणास मिळाल्याने धन्य समजतो. त्यांनी जगाला महाभारत, रामायण या ग्रंथांचा परिचय करताना, या मोठ्या ग्रंथांची रचना करणाऱ्या भारताचे आपण सुपूत्र असल्याचे 1864 मध्ये पोर्तुगाल संसदेत भाषण करताना सांगितले होते. हा इतिहास भावी पिढीपर्यंत पोहचला पाहिजे. ते समतावादी होते. ‘द ब्राह्मीण’ या पुस्तकांत त्यांनी धर्म व जातीविरोधी भूमिका स्पष्ट करून धर्मजात विरहित एकतेने राहणे गरजेचे असल्याचे लिहिले आहे. नावेलीत त्यांच्या नावे प्रकल्प सुरू केले आहेत. त्याला सरकारतर्फे सहकार्य मिळेल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कायदेमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी गोमीस यांच्या कार्याचा आपल्या भाषणात गौरव केला. त्यांचा उल्लेख गोव्याच्या नागरी शास्त्र पुस्तकात आहे. त्यांचे मातृभूमीवर निस्सिम प्रेम होते हे पोर्तुगीज संसदेतील केलेल्या भाषणातून दिसून येते, असे त्यांनी सांगितले.
आमदार उल्हास तुयेकर यांनी हा पुतळा उभारल्याने भावी पिढीला प्रोत्साहन मिळेल असे सांगितले. नावेली मतदारसंघाच्या विकासासाठी सरकार सर्वतोपरी मदत करीत आहे, असे ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांनी स्वागत केले. नावेली ही अस्मिताय भूमी आहे. या भूमीला श्रीमंत वारसा असून गोमीश यांच्या नावे जिल्हा ग्रंथालय या अगोदर सुरू झाले असून आणखी प्रकल्प सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

जयंती व पुण्यतिथी शासकीय पातळीवर
डॉ. फ्रांसिस्क लुईस गोमीस थोर महामानव होते. यांनी जगाला महाभारत, रामायण या ग्रंथांचा परिचय करताना, या मोठ्या ग्रंथांची रचना करणाऱ्या भारताचे आपण सुपूत्र असल्याचे 1864 मध्ये पोर्तुगाल संसदेत भाषण करताना सांगितले होते. हा इतिहास भावी पिढीपर्यंत पोहचला पाहिजे. यापुढे त्यांची जयंती व पुण्यतिथी शासकीय पातळीवर या पुतळ्यासमोर साजरी करण्यात येईल. त्या दिवशी जिल्हा प्रशासनतर्फे नावेली व परिसरातील विद्यार्थ्यांना येथे आणून त्यांना आदरांजली वाहिली जाईल असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल जाहीर केले.