पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मोदींनी माता गंगेचे पूजन आणि कालभैरवाचेही दर्शन घेतले. मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदी अनेक नेते उपस्थित होते.
काल आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी पंतप्रधानांनी गंगेचे पूजन केले आणि कालभैरवाचा आशीर्वाद घेतला. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 1 जून रोजी वाराणसीत मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी वाराणसी मतदारसंघामधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ते वाराणसीमधून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत.
पंतप्रधान मोदींची एकूण संपत्ती 3.02 कोटी
पंतप्रधानांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे एकूण संपत्ती 3 कोटी 2 लाख रुपये एवढी आहे. त्यांच्याकडे 52 हजार रुपये रोख आहेत.
मोदींच्या नावे स्टेट बँकेत दोन खाती आहेत. त्यांच्या गुजरात बँक खात्यात 73 हजार 304 रुपये आणि वाराणसीच्या खात्यात फक्त 7 हजार रुपये आहेत. मोदींची एसबीआयमध्येच 2 कोटी 85 लाख 60 हजार 338 रुपयांची एफडी आहे. मोदींनी नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये 9 लाख 12 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे.
याशिवाय जंगम मालमत्तेमध्ये त्यांच्याकडे सोन्याच्या चार अंगठ्या आहेत, ज्यांचे एकूण वजन 45 ग्रॅम असून, त्यांची किंमत 2 लाख 67 हजार 750 रुपये आहे. मोदींच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे ना घर आहे ना जमीन. त्यांची एकूण संपत्ती 3 कोटी 2 लाख 6 हजार 889 रुपये आहे.