मोदींना पंतप्रधानपदाचे गांभीर्य नाही

0
17

>> राहुल गांधींकडून लोकसभेतील भाषणाचा समाचार

मणिपूर हिंसाचारावरून विरोधी पक्षाने सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला होता; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरवर कोणतेही ठोस भाष्य न करता हसत हसत मणिपूरची चेष्टा केली. मणिपूरमध्ये लोक मरतायेत, महिलांवर अत्याचार होतायेत आणि आपले पंतप्रधान मोदी मात्र त्यांच्या भाषणात दोन तास चेष्ठा करत होते, ते हसत-हसत बोलत होते. भारताच्या पंतप्रधानांना हे वागणे शोभत नाही. खरेतर पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या पदाचं गांभीर्यच राहिलेले नाही, अशा शब्दात काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी मोदींच्या लोकसभेतील भाषणाचा समाचार घेतला.

विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीने आणलेल्या अविश्वास ठरावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल 2 तास 13 मिनिटांचे लांबलचक भाषण केले. ज्या मुद्द्यांवरून विरोधकांनी अविश्वास ठराव आणला, त्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी अगदी चार-पाच मिनिटेच बोलले. मोदींच्या याच भाषणाचा समाचार राहुल गांधी यांनी राजधानी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत घेतला.
मणिपूरचा हिंसाचार केंद्र सरकार थांबवू शकत होते; पण सरकारने तसे केले नाही, हा हिंसाचार सुरूच रहावा अशीच सरकारची इच्छा आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

पंतप्रधानांचे लोकसभेतील भाषण भारताबद्दल नव्हते, तर ते स्वतःबद्दल होते. भाजपच्या राजकारणामुळे मणिपूर राज्य उद्ध्वस्त झाले आहे.पंतप्रधान मणिपूरमध्ये जाऊ शकत नाहीत, तर त्यांनी लष्कराला पाठवावे. भारतीय लष्कर दोन दिवसात मणिपूरमधील हिंसाचार थांबवू शकते; पण मोदींना ते करायचं नाही, त्यांना मणिपूर जाळायचे आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये मणिपूरमध्ये असे कधीही घडले नव्हते, असेही राहुल गांधी म्हणाले.