मोदींच्या सभेची जय्यत तयारी

0
10

मुरगाव तालुक्यातील सांकवाळच्या पठारावर शनिवार दि. 27 रोजी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेसाठी भाजपाने जय्यत तयारी केली आहे. या सभेला जवळपास 50 हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता भाजपाच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. काल गुरुवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नियोजित सभास्थळी भेट देऊन कामाचा आढावा घेतला.
काल मुख्यमंत्र्यांबरोबर पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, दक्षिण गोवा माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी आमदार दामोदर नाईक, पक्षाचे पदाधिकारी संजीव देसाई, दत्ता खोलकर, चिखलीचे सरपंच कमलाप्रसाद यादव, सांकवाळचे उपसरपंच गिरीश पिल्ले, कुठ्ठाळी भाजपा मंडळाचे अध्यक्ष नारायण नाईक, मुरगावचे नगरसेवक दीपक नाईक, मुरगाव मंडळाचे अध्यक्ष संजय सातार्डेकर, अच्युत नाईक, संतोष केरकर यांची उपस्थिती होती. या सभेला जवळपास पन्नास हजार लोकांची उपस्थित असेल असा विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

सभा मुरगाव तालुक्यात होत असल्याने सभेच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मंत्री माविन गुदिन्हो, आमदार संकल्प आमोणकर, आमदार कृष्णा साळकर व इतर भाजप नेत्यांवर सोपवण्यात आल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. सभेला दक्षिण व उत्तर गोव्यातून मिळून 50 हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांचा मोठा प्रभाव असून त्याचा दक्षिण व उत्तर गोव्यातील भाजप उमेदवारांना मोठा फायदा होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा कुडचडे मतदारसंघात आयोजित करण्याचा विचार होता. मात्र, प्रदेश भाजपाने अखेर ही सभा मुरगाव तालुक्यातील सांकवाळच्या पठारावर घेण्याचे निश्चित केले आहे. ही सभा 27 रोजी संध्याकाळी बिटस्‌‍ पिलानी गोवा कॅम्पसच्या समोरील महामार्गाच्या बाजूला खुल्या जागेत होणार आहे. सदर ठिकाणी जमीन सपाटीकरणाचे काम पूर्ण झाले असून मंडपाचे काम अंतिम टप्प्यात पोचले आहे.