मोदींच्या सत्तरीनिमित्त १४ पासून भाजपचा सेवा सप्ताह

0
104

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर रोजी ७० वा वाढदिवस असून त्याचे औचित्य साधून येत्या १४ ते २० सप्टेंबर या दरम्यान भाजप सेवा सप्ताह पाळणार असल्याची माहिती प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

या सप्ताहानिमित्त सर्व चाळीसही मतदारसंघांत वेगवेगळ्या सत्तर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. त्यात रक्तदान शिबिर, गरिबांना मोफत चष्म्यांचे वितरण, स्वच्छता अभियान, प्लाझ्मादान, वृक्षारोपण, २०१४ साली सत्तेवर आल्यानंतर मोदी सरकारने केलेल्या कार्याची व्हर्च्युअल पद्धतीने लोकांना माहिती देणे, दिव्यांगाना लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य त्यांना देणे असा भरगच्च कार्यक्रम असेल, अशी माहिती तानावडे यांनी दिली.
त्याशिवाय २५ सप्टेंबर रोजी पं. दिनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त उपाध्याय यांनी केलेल्या कार्याची माहिती राजेंद्र आर्लेकर हे व्हर्च्युअल पद्धतीने भाजप कार्यकर्त्यांना देतील.

२ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त कार्यक्रम करण्यात येईल. त्याशिवाय २५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दरम्यान मोदींच्या आत्मनिर्भर भारत योजनेविषयी लोकांमध्ये जागृती करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला भाजपचे प्रवक्ते दामू नाईक व सिद्धार्थ कुंकळ्येंकर हेही हजर होते.