पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आधारकार्डसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. बिहारमधील मुजफ्फरपूर येथे एका तरुणाने पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या आधारकार्डसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी सदातपुर गावातून एका तरुणाला अटक करण्यात आली असून, त्याचे नाव अर्पण दुबे उर्फ मदन कुमार असे आहे. अहमदाबाद येथून सायबर पोलिसांचे पथक बिहारला आले होते. बिहार पोलीस आणि अहमदाबाद सायबर पोलिसांच्या पथकाने एकत्रपणे कामगिरी करत अर्पण दुबे याला बेड्या ठोकल्या. बुधवारी त्याला अहमदाबादला नेण्यात आले. दरम्यान, या प्रकरणामुळे आधारच्या डेटाबेसवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.