मोदींच्या अमेरिका दौऱ्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी

0
2

पंतप्रधान मोदी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पहिली भेट घेण्यासाठी 12-13 फेब्रुवारी रोजी अमेरिकेला जाणार आहेत. पंतप्रधान परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर पुढील आठवड्यात दिल्लीत मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्लीत भाजपने बहुमत मिळवल्याने त्यांच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. दिल्लीत नवे मुख्यमंत्री कोण असणार हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार याबाबतही उत्सुकता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्याहून आल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शनिवारी दिल्लीच्या मतमोजणीत 70 सदस्यांच्या विधानसभेत 48 जागा जिंकून भाजपाने 27 वर्षांची प्रतीक्षा संपवून दिल्लीत पुन्हा एकदा सत्ता मिळवली. गेल्या एक दशकापासून शहरात राज्य करणाऱ्या ‘आप’ने 22 जागा जिंकल्या, तर पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासह प्रमुख नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

भाजपच्या बैठका सुरू
शनिवारी संध्याकाळी, पंतप्रधानांनी पक्षाच्या मुख्यालयात गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि इतर नेत्यांसोबत बैठक घेतली. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर न करता निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या भाजपाने सरकारप्रमुख निश्चित करण्यासाठी उच्चस्तरीय बैठका सुरू केल्या आहेत, ज्यामध्ये पाच नेते प्रमुख दावेदार मानले जात आहेत.
नवी दिल्ली मतदारसंघात केजरीवाल यांचा पराभव करून जायंट किलर म्हणून उदयास आलेले परवेश वर्मा हे दिल्लीतील संभाव्य मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यांच्या यादीत आघाडीवर आहेत.

दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केलेले भाजपचे वरिष्ठ नेते विजेंदर गुप्ता, पूर्वी प्रदेशाध्यक्ष असलेले सतीश उपाध्याय, दिल्ली भाजपचे सरचिटणीस आशिष सूद आणि जितेंद्र महाजन हे इतर दावेदार आहेत.

आतिशी यांचा राजीनामा

विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाल्याच्या एका दिवसानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी रविवारी नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. पक्षाचा दारुण पराभवाला झाला असला तरी, आतिशी कालकाजी मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत.